इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
येत्या शैक्षणिक वर्षात ज्यांची मुले 3 ते 6 वर्षे पूर्ण करत आहेत त्यांनी आपापल्या पाल्यांनी आपल्या परिसरातील बालवाडी, अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घ्यावा. ह्या शाळा 100 टक्के अनुदानित असल्याने ह्या शाळांमध्येच प्रवेश घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाकडून सर्व पालकांना करण्यात आले आहे. देशातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्राथमिक शिक्षण देण्यासाठी सरकार बांधिल आहे.
पालकांनी हे केल्यामुळे अनेक गोष्टी साध्य होतील. कसल्याही प्रकारचे डोनेशन किंवा कोचिंग फी भरावी लागणार नाही.
सर्व सरकारी शाळांमधून आवश्यक व्यावसायिक प्रशिक्षण असलेल्याच शिक्षकांची भरती केली जाते. त्यामुळे तुमच्या पाल्यांना योग्य शिक्षण मिळेल. खाजगी शाळेत या गोष्टीचा काहीच भरवसा देता येत नाही अशी माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
माध्यान्ह आहार, शाळेचा युनिफाँर्म, सर्व विषयांची पाठ्यपुस्तके मोफत मिळतील.परिसरातली शाळा निवडल्यामुळे घर ते शाळा येण्या जाण्यासाठी लागणारा वेळ व वाहतूक खर्च वाचेल. या सगळ्या गोष्टींतून वाचलेला पैसा तुम्ही मुलाच्या इतर करियर विषयक कामांसाठी वापरू शकाल. जेव्हा परिसरातल्या सरकारी शाळेत एकदम मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतील तेव्हा शासनाला तिथली शिक्षकसंख्या व इतर अनुदान वाढवावेच लागेल. मोफत प्राथमिक शिक्षण हा सर्व विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. तो त्यांना मिळवून द्यायला मदत होईल. शिक्षण मातृभाषेत असल्यामुळे तुमच्या घरातील मंडळी घरबसल्या मुलांचा सहज अभ्यास घेऊ शकतील. मातृभाषेत शिक्षण मिळाल्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागायला मदत होईल. बाहेरचे क्लास लावण्याची फारशी गरज उरणार नाही. तेही पैसे वाचतील. आईने मुलाचा अभ्यास घेतल्यामुळे तिला मुलाच्या अडचणी समजतील, ज्या ती त्याच्या शिक्षकांना सांगू शकेल. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अनावश्यक विषयांचा ताण राहणार नाही. इथे तुमची मुले अत्यंत तणावमुक्त वातावरणात आनंदाने शिकतील. पैसेवाल्या पालकांना जायचे तिकडे जाऊदे. तुम्ही आपले बजेट पाहूनच निर्णय घ्या आणि पुढची आर्थिक पिळवणूक व मनस्ताप टाळा असे आवाहन शिक्षक संघाने केले आहे.
वेळ आणि पैसा वाचवा. इंग्रजी येत नाही तर मुलाचा अभ्यास कसा घ्यावा, चांगला क्लास कुठे लावावा ? जास्तीची फी कशी भरावी ? एवढे करून मुलाला तर काहीच समजत नाही. या ताणतणावातून बाहेर पडा. यश तुमचेच आहे.
- निवृत्ती यशवंत नाठे, आदर्श शिक्षक तथा अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघ इगतपुरी