प्रस्तावित मनमाड – कसारा लोहमार्ग आणि मेमूचा प्रश्न तातडीने मार्गी लावा : खासदार हेमंत गोडसे यांची महाप्रबंधकांना सुचना

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

नाशिक – कल्याण – नाशिक प्रवास दोन तासांचा व्हावा यासाठी प्रस्तावित मनमाड – इगतपुरी लोहमार्ग इगतपुरी ऐवजी कसाऱ्यापर्यंत नेणे गरजेचे आहे. याविषयीचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित असून मेमूचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईत रेल्वे महाप्रबंधक यांची भेट घेतली. नाशिक मुंबई दरम्यानच्या प्रवासासाठी जिल्हा वासियांचा वेळ आणि आर्थिक बचत व्हावी, जिल्हावासियांच्या विकासासाठी आणि नाशिक-मुंबई हे अंतर कमीतकमी वेळेत कापण्यासाठी प्रस्तावित मनमाड-इगतपुरी रेल्वेलाईन इगतपुरी ऐवजी थेट कसाऱ्यापर्यंत मेमूची लवकरात लवकर ट्रायल घ्यावी अशा सुचना खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबई येथील रेल्वेवे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांना केल्या.

नाशिक – कल्याण हे अंतर दोन तासाचे झाल्यास मुंबईला कमीत कमी वेळेत पोहचणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याने या दरम्यानच्या लोकल सेवेसाठी खासदार गोडसे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी खा. गोडसे यांच्या प्रयत्नातून ईएसयुची चाचणी नाशिक कल्याण या दरम्यान घेण्यात आली होती. मात्र कसारा ते इगतपुरी दरम्यान घाट व बोगद्यामुळे मोठा अडथळे येत आहेत. बँकर लावूनही हवी तशी ताकद मेमूच्या इंजिनला मिळत नसल्याने अखेर नाशिक – कल्याण लोकल सेवेला ब्रेक लागला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी इमू ऐवजी मेमू मेट्रोचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधीन आहे.

नाशिक, मुंबई आणि पुणे हे अंतर अवघे दोनशे किलोमीटरचेच असून या तीनही शहरांना विकासाचा सुवर्ण त्रिकोण समजला जातो. मुंबई – पुणे या दोन शहरांची कनेक्टीव्हीटी अति जलद असल्याने दोन ही शहरांचा विकास झपाट्याने झाला आहे. मात्र त्या तुलनेत मुंबई – नाशिक दरम्यानची कनेक्टीव्हीटी जलद नसल्याने नाशिक शहराचा हवा तसा विकास अद्याप झालेला नाही. नाशिक – कल्याण लोकल सेवा हा जलद कनेक्टीव्हीसाठीचा महत्वपूर्ण पर्याय आहे. मात्र यात इगतपुरी – कसारा येथील घाट आणि बोगद्यामुळे विविध तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने लोकलची अयशस्वी चाचणी यापूर्वी झालेली आहे. मनमाड – इगतपुरी रेल्वेलाईनचा प्रस्तावित प्रकल्प आहे. ही रेल्वेलाईन इगतपुरी ऐवजी कसाऱ्यापर्यंत केल्यास बोगद्यांची रुंदी वाढवून मेमू चायणी यशस्वी होवू शकते. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होणेकामी आवश्यक ती पावले उचलून मेमूची चाचणी घ्यावी अशी सुचना खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हा वासियांचा वेळ आणि आर्थिक बचत होण्यासाठी रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!