इगतपुरीनामा न्यूज – कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान सोनोशी यांच्यातर्फे गेल्या वर्षापासून कृषी विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षी कृषी विज्ञान शास्त्रज्ञ विभागातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना त्यांच्या ज्वारीच्या विविध जातीच्या संशोधनासाठी शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या शोधनिबंधाचे जगभर संदर्भ वापरले जातात. शेतकरी विभागातून निमज ता. संगमनेर येथील तुकाराम गुंजाळ यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. एकच बेडवर एकच मल्चिंग पेपर वापरून ११ महिन्यात तीन वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे. एकरी ५ हजर कॅरेट टोमॅटोचे रमी उत्पादन त्यांनी घेतले आहे. कृषी सेवा निगडीत पुरस्कार दातखिळे वाडी ता. जुन्नर येथील गांडूळ खत प्रकल्पाच्या संचालिका काव्या दातखिळे यांना प्रदान करण्यात येईल. त्यांचा गांडूळ खत प्रकल्प आणि कृषी विषयक युट्युब चॅनेल आहे त्यावर १ लाखाहून जास्त शेतकरी जोडले गेलेले आहेत. पुरस्कारांचे वितरण, शेती विषयक व्याख्यान आणि कृषी दिनदर्शिका प्रकाशन १६ नोव्हेंबरला सोनोशी येथे माजी मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होईल. यावेळी सुप्रसिद्ध आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे शेती आणि शेतकरी काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडे राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून वनस्पती शरीर विज्ञान विषयात पीएचडी आहे. त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासन व विस्तार कार्याचा व्यापक अनुभव आहे. ज्वारीच्या विविध वाण संशोधनात त्याचा सहभाग आहे. त्यांनी उपयुक्त असणाऱ्या शेती आणि शास्त्रज्ञ मंचाची स्थापना केलेली आहे. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोध निबंध प्रसिद्ध असून आणि त्यांचे शोधनिबंध अनेक ठिकाणी संदर्भ म्हणून वापरले जातात. तुकाराम काशिनाथ गुंजाळ मु. पो. निमज, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यांच्या १२ एकर क्षेत्रावर नेहमी नवनवीन प्रयोग पाहायला मिळतात. टोमॅटो पिकात एकरी ५ कॅरेट १२५ टन उत्पन्न घेऊन उच्चांक केला. १३ वर्षापासुन एकाच बेडवर एकाच मल्चिंगपेपर वर ११ महिन्यात ३ पिकांचे प्रयोग पाहायला मिळतात. झेंडू, टोमॅटो, दोडका पिकात सलग १३ वर्षांपासून सातत्य असून नगर जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक शेतकऱ्यांच्या भेटी अभ्यास दौरे माऊली फार्म येथे होतात. इस्राईल, उ. कोरिया, जम्मु काश्मीर, येथून अधिकारी शेतकरी भेटी झाल्या. तत्कालीन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आमदार पाशा पटेल, दूरदर्शनचे राम खकाळ यांची आणि कृषी विभागाचे सर्व अधिकारी यांच्या भेटी झाल्या. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व मोबाईलद्वारे मोफत मार्गदर्शन केले जाते. काव्या राजेश दातखिळे, संचालिका कृषी काव्या ॲग्रो इंडस्ट्रीज दातखिळेवाडी ता. जुन्नर ह्या सायन रुग्णालयात ३ वर्ष नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २ वर्षांपासून Youtubeद्वारे नवनवीन शेतीविषयक संकल्पना जगासमोर मांडल्या आहेत. शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय शेतकऱ्यांसाठी त्या देतात. उत्कृष्ठ प्रगतशील शेतकऱ्यांचे मॉडेलची माहिती सर्वांना नियमित देतात. शेती क्षेत्रात मागे नसणाऱ्या महिला तरुणींना जागतिक स्तरावर यशस्वी प्रवास घडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. सेंद्रीय शेतीसाठी गांडूळ खत प्रकल्पात ५०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना कृषीकाव्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्प येथे गांडूळ खताचे संपूर्ण प्रशिक्षण दिले.