इगतपुरीनामा न्यूज – कुटुंबाच्या वितभर पोटाची सातत्याने चिंता सतावणारे बांधकाम कामगार लक्ष्मण नारायण बेलदार यांच्या ३ कर्तबगार शिक्षक मुलांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे. वेहेळगावच्या गावाकुसाबाहेर भिल्ल वस्तीला लागून शेणामातीचे पत्र्याचे दहा बाय आठचे छोटेसे घरटे, ४ बहिणी, ३ भाऊ या मोठ्या कुटुंबासाठी काबाडकष्ट करणारे लक्ष्मण बेलदार ओळखले जातात. सोबतीला पत्नीही मुलांसाठी उपासमार सोसून शेतमजूरी, घरकाम हातभार लावायची. गरिबीने गांजलेले असूनही त्यांनी आपल्या मुलांवर कर्मयोगाची अतिशय बारकाईने पेरणी केली. मोठा मुलगा अशोक कुमावत ह्याचे डीएड केले. मंदा, सुनंदा ह्या मुलींचे लग्न करून दिले. मोठा मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून लागल्यानंतर दिवस बदलायला सुरुवात झाली. मोठे कुटुंब, महागाई, आजारपण या सगळ्यांना तोंड देत तिन्ही भावांनी एकजुटीने लढा दिला. तिघांनीही पडेल ती कोणतीही कामे न लाजता अभिमानाने केली. दोन्ही भावांचे डीएड झाले. गावातील शिक्षकांनी या तीनही भावांच्या गुणांची पारख करून त्यांना विविध पैलू पाडले. तिघेही भाऊ सर्व क्षेत्रात अष्टपैलू बनले. आई वडिलांची शिकवण, त्यांचे श्रम, कुटुंबाची डोळ्यादेखत जीवन जगण्याची रोजची चाललेली धडपड यातून झोपडीला सुंदर महाल बनवण्याचे स्वप्न या तीन कर्तृत्ववान भावांनी जिद्दीने साकार करून दाखविले.
मोठा भाऊ अशोक कुमावत- बेलदार डीएड बीएड प्रथम आला. पुढे त्याने एमए एमएड पर्यंत उच्चशिक्षण केले. त्याने शिष्यवृत्ती परीक्षा, राज्य राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट शिक्षक मार्गदर्शक, जिल्हा राज्य स्तरावर सातत्याने विविध स्पर्धेत विद्यार्थी झळकावणे, २१ वर्ष रक्तदान, व्यसनमुक्तीची व्याख्याने, मोटिव्हशनल स्पीकर, उत्कृष्ट सूत्रसंचालक, कवी, योग शिबिरे, गुणवत्तापूर्ण शाळा अशी राज्यभर स्वतःची ओळख निर्माण केली. २०११ मध्ये राष्ट्रीय तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. लहान भाऊ नामदेव लक्ष्मण बेलदार याने उत्कृष्ट अभिनेता, योगशिक्षक, मोटिवेशनल स्पीकर, विद्यार्थ्यांसाठी अन्नदाता, आदिवासींच्या मदतीमुळे प्रसिद्ध झाला. २०१८ ला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्याने मिळवला. दुसरा भाऊ संतोष लक्ष्मण बेलदार याने आपल्या चित्रकलेचा वारसा जोपासत उत्कृष्ट खेळाडू, उत्तम अभिनय, प्रामाणिकपणाच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात सन्मान मिळवला. २०२४ चा आदर्श शिक्षक पुरस्काराने तो सन्मानित होणार आहे. वेहेळगाव ता. नांदगाव येथील बेलदार परिवाराचा नावलौकिक सर्वत्र पसरला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने अशोक, नामदेव आणि संतोष यांची यशोगाथा सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.