बामची डबी गिळलेल्या १ वर्षीय मल्हारचे वाचले प्राण : काकड कुटुंबियांनी अनुभवला डॉक्टरांतील देवदूत

दीपाली जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – ‘परमेश्वरास संकटकाळी प्रत्येक वेळी उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्याने डॉक्टरांची निर्मिती केली आहे’ या विचाराची प्रचिती पानेवाडी ( ता. नांदगाव ) येथील काकड कुटुंबियांना बुधवारी आली. त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याने खेळता खेळता बामची डबी गिळली असता त्यास मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले. त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकडे कुटुंबीयांनी देवदूत अनुभवला हे नक्की. ! सागर काकड यांचे कुटुंबीय शेतीच्या कामातून थकून सायंकाळी घरी परतले. रात्री नऊच्या दरम्यान जेवण करत असतांना त्यांच्या १ वर्षाच्या मल्हारने खेळता खेळता बामची डबी गिळल्याचे सागर यांनी बघितले. त्यांनी त्वरित ती डबी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ती डबी घशात सरकली. आता मात्र काकड कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांनी त्वरित मल्हार यास मनमाड येथे हलविण्याचा निर्णय घेतला. पानेवाडी ते मनमाड हे अडीच किलोमीटरचे अंतर त्यांनी अवघ्या दहा मिनिटांत गाठत देवकी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. बालरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र रजपूत आणि डॉ.विजय रजपूत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित उपचार सुरू केले. मल्हारने डबी गिळल्यामुळे त्याच्या पालकांनी घरी ती काढण्याचा प्रयत्न केला असल्याने त्याच्या घशात जखमा झाल्या होत्या.  त्यामुळे त्याचा घसा पुर्णतः रक्ताने माखलेला होता. या काळात मल्हारची ऑक्सिजन पातळी ३६- ३७ पर्यंत खाली घसरली होती. तसेच फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील ८०- ९०% बंद झाला होता. अशा दुहेरी आव्हानाला सामोरे जात कल्पकतेने डॉ. रजपूत बंधू यांनी शर्थीचे प्रयत्न करत लरिंगोस्कोपच्या मदतीने ही डबी बाहेर काढून मल्हारचे प्राण वाचविले. मल्हारला हॉस्पिटलमध्ये आणण्यास थोडा उशीर झाला असता किंवा घशात अडकलेली डबी काढतांना आणखी थोडी खाली सरकली असती तर मल्हारच्या जिवितास धोका होता. कठीण प्रसंगात मल्हारचे प्राण वाचवल्याबद्दल डॉ. रजपूत बंधू यांचे आभार मानताना काकड कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. “मल्हारला बघितले तेव्हाच आव्हानाची जाणीव झाली होती. घसरलेल्या ऑक्सिजन पातळीने या आव्हानात आणखी भर घातली. परंतु कौशल्य पणाला लावून मल्हारला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यास आम्हाला यश याले याचा आनंद आहे.” अशी प्रतिक्रिया डॉ. रवींद्र आणि विजय रजपूत यांनी दिली. “डॉक्टरांना देवदूत का म्हणतात हे आज समजले. ही घटना बघून अक्षरशः हादरून गेलो होतो. डॉक्टरांनी मल्हारला सुखरूप आमच्या स्वाधीन केले. डॉक्टरांचे हे उपकार आयुष्यभर न विसरण्यासारखे आहेत असे मल्हारचे वडील सागर काकड यांनी सांगितले. 

Similar Posts

error: Content is protected !!