
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो, ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला आज संतप्त पालकांनी टाळे ठोकले. मागील महिन्यात दिलेला पर्यायी शिक्षक आता शाळेत येणे बंद झाले आहे. इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी जिल्हा पातळीवर शिक्षक मागणीचा प्रस्ताव पाठवला नसल्याने या शाळेसाठी आता शिक्षक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना एकमेव शिक्षकावर अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार धरून गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्तार अधिकारी अशोक मुंढे यांची अन्य ठिकाणी बदली करावी, ह्या शाळेसाठी तातडीने सोमवारच्या आत कायमस्वरूपी शिक्षक द्यावा अशी इथल्या पालकांची मागणी आहे. ह्यासाठी पहिली ते सहावीमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या माता सोमवारी सकाळी ९ वाजता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांच्या मुंबई येथील निवासस्थानी धडकणार आहे. लाडक्या लाडक्या बहिणी म्हणता आणि त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता का? असा सवाल यावेळी विचारला जाणार आहे. आम्हाला १५०० दिले, भाच्यांना शेळ्या घेऊन द्या किंवा कायमचा शिक्षक मिळवून द्या अशी मागणी करण्यात येणार आहे. एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे सुरेखा भगवान मधे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी पिंप्री सदो येथील महिलांसोबत सहभागी होणार आहे.