इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर १७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक घोषित : ५ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला होणार मतमोजणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत परिणामकारक ठरणाऱ्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह १७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. १६ ते २० ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान तर निकाल ६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन तर पोटनिवडणूकीसाठी पारंपरिक हस्तलिखित स्वरूपात अर्ज दाखल करावा लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने प्रभावी नियोजन केले असल्याची माहिती तहसीलदार अभिजित बारवकर यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी, शिरसाठे, मोडाळे, कुशेगांव, मोगरे, धारगांव, नागोसली, ओंडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दौंडत, उंबरकोन, सोमज, बोरटेंभे, नांदगांव सदो ह्या १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आज घोषित झाली. धार्णोली, मुरंबी, उभाडे, आहुर्ली, कुऱ्हेगांव, पिंप्रीसद्रोद्दीन, तळोशी, चिंचलेखैरे, घोटी खु., बोर्ली, आवळखेड, टाकेद बु., टिटोली, कुर्णोली, बलायदुरी, फांगुळगव्हाण, भावली बु. ह्या ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांची पोटनिवडणूक घोषित झाली.

६ ऑक्टोबरला निवडणुकीच्या नोटीसीची प्रसिद्धी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १६ ते २० ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ह्या कालावधीत दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. माघारीसाठी २५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी २५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेनंतर होणार आहे. ह्या ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला सकाळी ७. ३० ते ५. ३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. इगतपुरी तहसील कार्यालयात मतमोजणी  ६ नोव्हेंबरला करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अत्यंत चुरस आणि तीव्र स्वरूपाच्या स्पर्धा ह्या निवडणुकीत दिसून येतील. यासाठी विविध गटांच्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून उमेदवारांची विक्रमी संख्या निवडणुकीत दिसून येईल. इच्छुकांची धावपळ उडाली असून आरक्षण बदलले असल्याने कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!