क्षितिज विस्तारतांना…

प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे

लेखन – प्रा. छाया लोखंडे, एसएमआरके महिला महाविद्यालय, नाशिक

ज्ञानदान आणि समाजकार्य याची अनोखी सांगड घालणाऱ्या कर्तृत्ववान प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांची गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार पदी नियुक्ती झाली आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
केवळ नाशिककरांनाच नव्हे तर सर्वसामान्य भारतीयांना अभिमान आणि आत्मीयता वाटेल अशी गोखले एज्युकेशन सोसायटीची कारकीर्द आहे. उत्तरोत्तर बहरत जाणा-या संस्थेच्या या कारकिर्दीकरिता योगदान देणारे एक प्रमुख नाव म्हणजे प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे. सर्वप्रथम गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदारपदी नियुक्ती झाल्याबद्धल त्यांचे खूप खूप अभिनंदन ! व त्यांना पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! आदरणीय मॅडम बद्दल  लिहिताना कागद पेन पुढ्यात घेतला तेव्हा बा. भ. बोरकरांच्या ओळी मनात रुंजी घालत होत्या. आदरणीय मॅडमचे माहेरचे नाव नेत्रा. बोरकरांच्या कवितेतील नेत्रप्रभा जणू मॅडमचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित करत जातेय असे वाटले.
 देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथी चालती
वाळवंटातूनसुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
तेच डोळे देखणे
जे कोंडीती सार्‍या नभा
वोळिती दुःखे जनांच्या
सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणी ती जीवने
जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे..

उच्च शिक्षण क्षेत्रातील कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या शिक्षणतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्राला डॉ. दीप्ती देशपांडे यांचा परिचय आहे. एसएमआरके, बीके, एके. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचआर डायरेक्टर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील पदव्युत्तर संशोधन विभागाच्या संचालिका या पदांवर त्या सध्या कार्यरत आहे. या व यांसारख्या अनेक अत्यंत महत्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केलेले आहे. सहस्त्राहून अधिक शोधनिबंध असोत, संशोधनात्मक लेख असोत, विविध विषयांवरील पुस्तकांचे लेखन असो, नियतकालिकांचे संपादन असो, अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, व राज्य पातळीवरील चर्चासत्रांचे आयोजन आणि कितीतरी उल्लेखनीय राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार अशी त्यांच्या कर्तृत्वाची यादी फार मोठी आहे. तरीदेखील पित्याने म्हणजेच आदरणीय स्वर्गीय डॉ. मो. स. गोसावी सरांनी पाहिलेल्या स्वप्नांकडे वाटचाल करणारा त्यांचा प्रवास मला कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक उल्लेखनीय वाटतो. शिक्षणक्षेत्रात काही चांगले घडत राहावे असे वाटणार्‍या आपल्या सगळ्यांसाठी काही घटना नोंदविणे मला महत्वाचे वाटते. मॅडमच्या कारकिर्दीत त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली जागतिक शांतता परिषद तिच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे माझ्या फार लक्षात राहिली. इतक्या भव्य परिषदा आयोजित करणे, उत्तमोत्तम व्याख्यात्यांना निमंत्रित करणे, या आणि अशा परिषदांच्या निमित्ताने सहकार्‍यांमधल्या क्षमतांची त्यांना जाणीव करून देणे अशा किती गोष्टी सांगता येतील. अशी जागतिक स्तरावरची परिषद असो की दरवर्षी भरणारे महाविद्यालयातील ‘सृजन’ सारखे शैक्षणिक प्रदर्शन असो, मॅडमने या निमित्ताने अनेकांच्या आयुष्याला दिशा दिली. कलाकारांना  कलेचा पाठपुरावा करण्याचा, आयुष्यभर पुरेल असा मंत्र दिला.

‘अ गुड लीडर इज अ गुड लिसनर’ असे म्हणतात. याचा प्रत्यय त्यांच्या सहवासातील प्रत्येक व्यक्तीला असेल. आपले सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या अडचणी संयमाने ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असताना त्यांनी नेतृत्व कसे असावे याचा अप्रत्यक्षरीत्या वस्तुपाठच घालून दिलेला आहे. जगाच्या लोकसंख्येचा अर्धा हिस्सा असणाऱ्या स्त्रियांच्या क्षमतांचा योग्य प्रकारे उपयोग केल्याशिवाय स्त्रियांची प्रगती शक्य नाही. संधी मिळाली तर स्त्रिया कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास सक्षम असतात हे त्यांनी उदाहरणातून दाखवून दिले. एका महिला महाविद्यालयाच्या माध्यमाद्वारे मुलींना रोजगारनिर्मितीक्षम शिक्षण देणे, फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर तब्बल तेहतीस वैविध्यपूर्ण पाठ्यक्रमांद्वारे विद्यार्थीनींना निरनिराळ्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनण्यास सहाय्य करणे आणि हे शिक्षण घेत असतानाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कलेचा पैलू विकसित करणे हे डॉ. देशपांडे मॅडमने शिकविले. पतंजलीने हजारो वर्षांपूर्वी ‘योगसूत्र’ ग्रंथात सांगितलेल्या सूत्रानुसार ‘जेव्हा तुम्ही उदात्त हेतूने प्रेरित होऊन एखादा मोठा प्रकल्प हाती घेता, तेव्हा तुमचे विचार बंधनातून मुक्त होतात, तुमचं मन साऱ्या मर्यादा पार करून अलौकिक उंची गाठतं, तुमच्या विवेकबुद्धीचा सर्व दिशांनी विस्तार होतो आणि मग तुम्हाला एक नवं, अनोखं, अदभूत विश्व गवसतं. तुमच्यात सचेतन झालेल्या सुप्त शक्ती, प्रज्ञा आणि प्रतिभांमुळे तुम्हाला तुमचा नव्याने शोध लागतो.’ वर उल्लेखिल्याप्रमाणेच अखंड कार्यमग्न राहून, नेहमी नवनवीन प्रकल्पांचे आयोजन करून ते तडीस नेणे आणि सतत त्यातून नवे काहीतरी शिकत असताना ‘स्व’ चा शोध घेणे; त्यातून स्वतःचे व इतरांचेही आयुष्य उजळताना मॅडम समृद्ध होताना दिसतात.

जर्मन तत्ववेत्ता शोपेनहॉवरने संगीताला सर्वश्रेष्ठ आणि जिवंत कला म्हटले आहे. कोरोनाच्या भयावह काळात तर गाण्याची एखादी लकेर यावी आणि सगळं पुन्हा बहरून यावं असं वाटतं. महाविद्यालयात, संस्थेत, गाण्याचे कितीतरी बहारदार कार्यक्रम आयोजित करून मॅडमने कलेची जोपासना तर केलीच पण अनेक गुणी कलाकारांना पाठबळ दिलं. मॅडमचं संगीतावरील प्रेम पाहता वाटतं, माणसाने कितीही संकटे आली तरी कोणत्याही परिस्थितीत गात राहावं. महिला महाविद्यालयाच्या नेतृत्वाच्या व्याख्येत मॅडमचं व्यक्तिमत्त्व चपखल बसतं असं म्हणताना आठवते ती महाविद्यालयातील आरोग्यविषयक कार्यक्रमांची मेजवानी. झपाट्याने बदलत जाणार्‍या जीवनशैलीमुळे स्त्रियांच्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणार्‍या मॅडमने महिला महाविद्यालयात अनेकदा आरोग्यविषयक चर्चांसाठी, व्याख्यानांसाठी अनेक तज्ज्ञांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. आपल्या स्त्री सहकार्‍यांच्या समस्यांची, प्रश्नांची जाण असल्याने त्यांनी संयमित भावनेने प्रश्न ऐकून मार्गदर्शन केलेलं मी पाहत आले आहे. इतकं की संस्थेचा घटक असलेल्या सर्वसामान्य व्यक्तीलाही समस्या असल्यास आपली दखल घेतली जाईल हा विश्वास असतो. मला वाटतं अशा आधारस्तंभ व्यक्तिमत्वाच्या खांद्यावरच सर्वार्थाने मोठ्या असलेल्या शैक्षणिक संस्थांचे डोलारे उभे राहत असतात. वैयक्तिक पातळीवर सांगायचे झाल्यास आयुष्यात महत्वाच्या टप्प्यांवर योग्य मार्गदर्शकाची भूमिका निभावणाऱ्या मॅडम माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. यशासारखी दुसरी प्रेरणा नसते असं म्हणतात परंतु माझ्या या गुरूंकडून पाठीवर मिळणारी शाबासकीची थाप मला अधिक प्रेरणादायी वाटते. धाडसी, परखड आणि त्याच वेळी हळुवार आणि संवेदनशील असं अनोखं मिश्रण असल्याने एक स्त्री किती कुशल प्रशासक असू शकते हे त्यांच्या कर्तृत्वातून अधोरेखित होते. एक कर्तृत्ववान मुलगी, आदर्श सहचरिणी, प्रेमळ आई, जीवापाड मैत्री जपणारी मैत्रीण, जातिवंत शिक्षिका आणि निर्विवाद सर्वोत्कृष्ट नेतृत्व अशी कितीतरी विशेषणे त्यांचं वर्णन करायला अपुरी पडावीत. इथे मला इंग्रजी साहित्यातील सुप्रसिध्द कवयित्री सिल्विया प्लाथच्या ओळी आठवतात, “हाऊ कॅन यू बी सो मेनी वुमन टू सो मेनी पीपल?!” आपल्या कार्यकर्तृत्वानेवाने यशाचे नवनवीन शिखर गाठणाऱ्या मॅडमच्या कार्याचे क्षितिज आता या पदावर विराजमान झाल्यामुळे विस्तारत आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आणि माझ्या गुरुंना पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा !       
      

Similar Posts

error: Content is protected !!