
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबवला आहे. तीन दिवसात २ हजार राख्या आणि स्वलिखित शुभेच्छा पत्रे भारतीय सैनिकांसाठी तयार करण्यात आली आहेत. ह्या राख्या आणि शुभेच्छा पत्र पोस्टाद्वारे देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवली जाणार आहेत. ३० ऑगस्टला होणाऱ्या रक्षाबंधनाच्या आधी सैनिकांसाठी पोस्टाद्वारे विद्यार्थिनींच्या भावना भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचणार आहे. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभिमान ही वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सण, उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. विद्यार्थीनींनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनाही मिळेल. यासाठी हा उपक्रम महात्मा गांधी हायस्कूलतर्फे राबवण्यात आला आहे. याबद्धल विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.