लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. नुसते जय भवानी जय शिवाजी म्हणून चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचे आचरण करणे गरजेचे आहे. त्यांचे विचार डोक्यावर नाचवले पाहिजे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. देविदास महाराज वारुंगसे यांनी केले. बेलगाव कुऱ्हे येथे शिवजयंती निमित्ताने शिवव्याख्याते वारुंगसे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सांगताना बोलत होते. जीवाशी लढणाऱ्या शिवाजी महाराजांनी जीवनाची राखरांगोळी करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवपूर्व काळ कसा होता, त्यांचे बालपण, माता जिजाऊ आदी माहिती त्यांनी सांगितली.
प्रत्येकाने शिवचरित्र वाचले तर जीवनात प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. घराघरात संवाद साधल्यास शिवबा घडतील. प्रत्येकाने छत्रपती समजून घेणे गरजेचे आहे असेही शिवचरित्रकार वारुंगसे म्हणाले. शिवाजी महाराजांचे गुण लक्षात घेऊन आई वडिलांची सेवा करून त्यांचे स्वप्न पूर्ण करा. शिवबांच्या जीवनात अनेक प्रसंग आले मात्र त्याचा सामना करून स्वराज्याची निर्मिती केली. प्रत्येक तरुणांच्या चेहऱ्यावर तेज असले पाहिजे, मनात उत्साह, मातृभूमी विषयी प्रेम, ध्येय, उच्च स्वप्न असावे. दीनदुबळ्यांचा मित्र, देवावर भक्ती, जीवन शुद्ध ठेवले तर शिवाजी महाराजांचा मावळा निश्चितच घडण्यास मदत होईल असे शेवटी शिवव्याख्याते देविदास महाराज वारुंगसे म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली. यावेळी बेलगाव कुऱ्हे येथील ग्रामस्थ, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.