इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात खरिप हंगामात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त ५५० हेक्टरवर नागली प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासोबत तालुक्यातील २०० शेतकऱ्यांकडे नागली पिकांचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव, आंबेवाडी, वासाळी, इंदोरे, बारशिंगवे, खेड, कानडवाडी, भरवज, निरपण, कवडदरा, भंडारदरावाडी, शिरेवाडी, घोडेवाडी, सोनोशी, गंभीरवाडी, निनावी आदी गावांमध्ये ५५० हेक्टर क्षेत्रावर सुधारित फुले नाचणी वान ह्या नागली पिकांचा प्रकल्प राबवला जाणार आहे. ह्या प्रकल्पातील सर्व शेतकऱ्यांचे माती नमुने शास्त्रीय पध्दतीने घेण्यात येऊन तपासणीसाठी मागील महिन्यात मृद चाचणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तपासणीचे अहवाल नागली लागवडीपूर्वी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत वाटप करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना योग्य खतांची मात्रा देता येईल. राहुल नगर येथे प्रकल्पानुसार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गुलाब भले, ग्रामपंचायत सदस्यांनी सोमनाथ घाणे, सरपंच अशोक बोराडे, शंकर चोथवे, विक्रम भोईर, भाऊराव भले, सुरेश भले, शरद भोईर, आनंद रोंगटे, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, कृषी सहाय्यक विजय कापसे, रमेश वाडेकर, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या असणाऱ्या परंतु मानवी आहारात अत्यंत महत्वाचा घटक असणाऱ्या नागली पिकाचा प्रसार व्हावा, शेतकऱ्यांना नागलीचे उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून उत्पादनात वाढ व्हावी ह्या उद्धेशाने हा प्रकल्प राबवला जात आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था ( आत्मा ) नाशिक यांच्यातर्फे कृषी विभागामार्फत २०० एकर शेतकऱ्यांकडे नागली पिक प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. दोन्ही प्रकल्पातील शेतकऱ्यांना नागली बियाणे एकरी २ किलो, तणनाशक, युरिया ब्रिकेट आदी निविष्ठा पुरवठा करण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने नागली पिकाची लागवड करून उत्पादन व उत्पादकता वाढवावी, यासाठी कृषी विभाग सहकार्य करणार आहे.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त इगतपुरी तालुक्यात नागलीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे. नागली सारख्या पिकाला शहरी भागात चांगली मागणी आहे. आहारातील महत्व वाढत असल्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. नागली पिकाकडे शेतकऱ्यांनी पुन्हा वळावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
- किशोर भरते, कृषी पर्यवेक्षक, इगतपुरी