राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा : घोटी बाजार समितीसाठी ३० एप्रिल पूर्वी होणार निवडणुकीची सर्व प्रक्रिया

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – महाराष्ट्रातील ज्या बाजार समित्यांची मुदत संपून निवडणुका घेणे आवश्यक आहे त्या बाजार समित्यांची निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून आज महाराष्ट्र बाजार समिती निवडणूक प्राधिकरणाला आदेश निर्गमित करण्यात आला. ह्या निवडणुकांची निकाल लागेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्याचे निर्देश निवडणूक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. अनेक याचिकांची एकत्रित सुनावणी घेऊन हा आदेश देण्यात आला आहे. या आदेशामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी इच्छुकांनी आता तयारी सुरु केल्याचे चित्र तालुकाभर दिसणार आहे. खंडपीठाने आपल्या आदेशात ज्या बाजार समितीचा कार्यकाळ संपला असून त्या नंतर जे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे तेथे शासकीय प्रशासक नियुक्त करण्या बाबत आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी निवडून आलेले संचालक मंडळ कार्यकाळ संपल्यानंतरही कार्यरत आहे त्यांनी शासनाकडे मुदतवाढ मिळावी म्हणून अर्ज करण्याबाबत मुभा देण्यात आली. त्यावर शासन अथवा सक्षम अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर तपासणी करून निर्णय घ्यावा असे आदेशात नमूद आहे.

या आदेशामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून निवडणुकीची घोषणा, मतदान दिनांक, मतमोजणी दिनांक याचे नियोजन निवडणूक प्राधिकरणाकडून केले जाणे अपेक्षित आहे. घोटी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून ११ जागा, ग्रामपंचायत सदस्य गटातून ४ जागा, व्यापारी गटातून २ जागा, आणि हमाल मापारी गटातुन १ जागा अशा १८ जागांसाठी निवडणूक व्हायचा मार्ग मोकळा झाला असून आर्थिक दुर्बल गट ह्या निवडणुकीत ह्यावेळी असणार नाही. निवडणुकीसाठी प्रारूप व अंतिम मतदार याद्या कोणत्या अहर्ता दिनांकावर केल्या जाणार आहेत याबाबत संभ्रम आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी ( कृ. उ. बा. स. ) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, प्रारूप मतदार यादीवर हरकती/आक्षेप मागवणे, हरकती/आक्षेप ह्यावर निर्णय देणे, अंतिम मतदार यादी तयार करणे यासाठी निवडणूक प्राधिकरणाकडून तारखा घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, नामनिर्देशनपत्र विक्री व स्वीकृती आणि नामनिर्देशनपत्र प्रसिद्धी, छाननी, वैध नामनिर्देशनपत्रांची प्रसिद्धी, माघार, निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी निवडणुकीसाठी मतदान, मतमोजणी आणि निकालाची घोषणा असा निवडणूक कार्यक्रम इच्छुकांची प्रतीक्षा वाढवत आहे. 

Similar Posts

error: Content is protected !!