इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
प्रवासात गर्भवती महिलांसह अनेक गरजू रुग्णांसाठी रेल्वे नेहमीच सक्रिय भूमिका बजावते. आजच्या एका घटनेत प्रियंका शर्मा नामक गरोदर महिला लोकमान्य टिळक टर्मिनस ते फुलपूर (प्रयागराज जवळ) 11071 कामायनी एक्स्प्रेसच्या शयनयान श्रेणीमधून प्रवास करत होत्या. आज दुपारी ट्रेन कसारा आणि इगतपुरी दरम्यान होती तेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. ऑन-बोर्ड टीसी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब याबाबत उप स्टेशन व्यवस्थापक ( वाणिज्य ) इगतपुरी आनंद शिंदे यांना माहिती दिली. संदेश मिळाल्यावर श्री. शिंदे यांनी इगतपुरी स्टेशनवर महिला डॉक्टर आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल सुश्री सविता यांची S/9 कोचच्या बर्थ क्र ६ वर येण्याची व्यवस्था केली.
डॉ. ज्योत्सना, अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि टीम उपस्थित झाले व रुग्णाला तपासून इगतपुरी येथे थांबण्याचा सल्ला दिला. तथापि, प्रसूती वेदना असलेल्या प्रियंका या महिलेने रेल्वे वैद्यकीय पथकाच्या मदतीने स्थानकाच्याच प्रतिक्षालयात एका निरोगी बाळाला जन्म दिला. नवजात व महिलेला प्रसूतीपश्चात उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.