ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा – सॅमसोनाईट कंपनीचे माजी ग्लोबल सीईओ रमेश तैनवाला : सॅमसोनाईट कंपनीत ग्रामसेवकांची कार्यशाळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – गोंदे दुमाला येथील सॅमसोनाईट साउथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी ( ग्रामसेवक ) यांची बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी कंपनीचे माजी ग्लोबल सीईओ रमेश तैनवाला, व्हाईस प्रेसिडेंट यशवंत सिंग आणि सीएसआर प्रमुख मिलिंद वैद्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये कंपनीतर्फे गेल्या १५ वर्षांपासून सुरु असलेले वृक्षारोपण, शाळेचा विकास, तलावांचे खोलीकरण, गांडूळ खत प्रकल्प आदी बाबत मिलिंद वैद्य यांनी प्रास्ताविक करून भविष्यातील धोरणाबद्दल ग्रामसेवकांना संबोधित केले.
या चर्चासत्रात ग्रामसेवकांनी मनोगत व्यक्त केले. यात गोंदे दुमाला येथील ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव यांनी कंपनीने आतापर्यंत गावात केलेल्या कामांची माहिती सांगून कचरा उचलण्यासाठी घंटागाडी ट्रॅक्टर भेट देऊन गावातील स्वच्छतेला हातभार लावल्याचे सांगितले.

भावली खुर्दच्या ग्रामसेविका रुपाली जाधव यांनी त्या आवळखेड ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना कंपनीच्या सहकार्यातून दोन विहिरींचे खोलीकरण, पाण्याची टाकी आणि त्यासाठी पाईपलाईन करून दिल्याची सांगितले. वाकीच्या ग्रामसेविका ज्योती केदारे यांनी वृक्षारोपण, जलसंर्वधनासोबत ग्रामीण आदिवासी भागातील तरुण तरुणींना स्वयंरोजगारांचे साधने उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले. शेनवड बुद्रुकच्या ग्रामसेविका सरला राठोड यांनी शेवग्याच्या झाडाचे महत्त्व सांगितले. यावर्षी ५०० शेवग्याची रोपे सॅमसोनाईट मार्फत देण्याची विंनती केली. शिरसाठेचे ग्रामसेवक हनुमान दराडे यांनी गावामध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामांबद्दल राज्यस्तरीय विशेष पुरस्कार व नाशिक विभागस्तरीय प्रथम पुरस्कार शिरसाठे ग्रामपंचायतीला मिळाल्याचे सांगितले. त्र्यंबकेश्वर तोरंगणचे ग्रामसेवक विनोद वाकचौरे यांनी पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधून आदिवासी तरुण तरुणींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तयार करण्याचे सूचना केली.

यशवंत सिंग म्हणाले की, भविष्यात सरकारी नोकरीच्या संधी अतिशय कमी होत जातील. यापेक्षा तरुणांनी स्वयंरोजगाराच्या संधींवर लक्ष केंद्रित करावे. भविष्यात पर्यावरण पूरक रोजगारात चांगल्या संधी उपलब्ध होतील. यासाठी फळझाडे लागवड, गांडूळ खत निर्मिती आणि यावरील प्रक्रिया उद्योग संदर्भात काम करावे. सर्व ग्रामसेवक हे गाव आणि प्रशासन यातील दुवा असल्याने तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचविण्याचे एक महत्वाचे कार्य करत असल्याने ते संपूर्ण प्रक्रियेचा कणा असल्याचे रमेश तैनवाला यांनी सांगितले. शिरसाठेचे उदाहरण देऊन शासनावर, सामाजिक संस्थांवर भविष्यात अवलंबून न राहता गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी ग्रामसेवकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. गावातील नागरिकांचे पोषणमूल्य वाढावे यासाठी प्रत्येक कुटुंबाला केसर आंबा, पेरू, सीताफळ, चिकू, जांभूळ, फणस आणि शेवग्याची रोपे देणार असल्याचे सांगितले. गावातील गायरान जागेवर पर्यावरणपूरक आणि गावातील रोजगार वाढविणेसाठी वृक्षारोपणासाठी सहकार्य करू असे सांगितले. झाडे जगवणे सुद्धा महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत अधिनस्थ तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण,डोंगर उतारावर चाऱ्या ( सीसीटी ) करून अधिकाधिक पाणी जमिनीत जिरवण्यासाठी मार्गदर्शन केले. रासायनिक खतांचा अधिक वापराने जमिनीचे नुकसान होत आहे, खतांच्या अवास्तव किमती, पिकांसाठी लागणारे खर्च आणि बाजारभाव यातील तफावत यामुळे आज नवीन पिढी शेतीबाबत उदासीन आहे. जमिनीचा खालावलेला पोत सुधारण्यासाठी गांडूळ खताचा वापर करणेसाठी गांडूळ खताच्या बॅग, गांडूळे आणि वेस्ट-डी- कंम्पोजर हे शेतकऱ्यांना देणार आहे. यासाठी ग्रामसेवक गावामध्ये जनजागृती करतील असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन विनोद सूर्यवंशी, पंकज महाजन यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!