
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे हिंदू भाविकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. धर्म, जात किंवा संप्रदायापलीकडे जाऊन देशासाठी एकत्र येण्याचा संदेश देत या निषेधात सर्वसामान्य मुस्लिम नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. दुपारी नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव सरदार वल्लभभाई पटेल चौकात एकत्र जमले. त्यांनी दंडावर काळ्या फिती बांधून आणि “आम्ही आतंकवादाच्या विरोधात आहोत” अशा आशयाचे फलक हातात घेऊन शांततेत आंदोलन केले. हिंदुस्तान जिंदाबाद” आणि “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा जोरदार घोषणा देत त्यांनी अतिरेकी कृत्याचा निषेध नोंदवला. हा हल्ला कोणत्याही धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही, तर तो मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी सर्वांनी पाच मिनिटे स्तब्ध उभं राहत पहेलगाम येथील हल्ल्यात मृत पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थित मुस्लिम समाजातील नेत्यांनी सांगितलं की, “आम्ही या देशाचे नागरिक असून आतंकवादाच्या कोणत्याही स्वरूपाला पाठिंबा नाही. हिंसेला धर्म नसतो, आणि मानवतेला जात नसते.”या निषेधाद्वारे इगतपुरी शहरातून एकात्मता, शांतता आणि देशप्रेमाचा ठळक संदेश दिला गेला. यावेळी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता