ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. 16
रहदारी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या त्र्यंबक आंबोली रस्त्याची बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे पूर्ण वाट लागली आहे. साधे खड्डे बुजवण्याची देखील तसदी घेत नसल्याने निष्काळजीपणाचा अक्षरशः कळस झाला आहे. संबंधित विभागाला जाग कधी येणार असा प्रश्न येथील वाहनधारक यांना पडला आहे. नागरिकांचा जीव जाण्याची हा विभाग वाट पाहत आहे काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या रस्त्यावरून जव्हार, हरसुल मार्गे जाणाऱ्या अनेक वाहनांची वर्दळ असते. ठिकाठिकाणी मोठे खड्डे असल्याने वाहनांचे अपघात नित्याचेच झाले आहेत. असे असतांना बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची तरी तसदी घ्यावी अशी मागणी येथील वाहनधारक करत आहेत. संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करावे अन्यथा वाहनधारक, दूध विक्रेते संघटनेच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे नागरिकांनी सांगितले.
संबंधित विभागाला वारंवार संपर्क करूनही खड्ड्यांकडे सर्रास दुर्लक्ष आहे. यामुळे अनेक वाहनधारकांना जीव गमवावा लागलेला आहे. खड्डे बुजवण्याचे काम सुरु न केल्यास त्रस्त वाहधारकांच्या माध्यमातून रास्तारोको आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. मोठा अपघात होऊन कोणाचा जीव गेल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
- ज्ञानेश्वर मेढेपाटील, सामाजिक कार्यकर्ते
- योगेश मेढे, अध्यक्ष आंबोली युवा मंच