इगतपुरीनामा न्यूज, दि. 17
इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम ग्रामीण आदिवासी भागातील महिलांनी मधमाशी पालनातून उत्पादीत केलेल्या अस्सल मधाचा गोडवा नाशिककरांना चांगलाच भावला आहे. जीवनसंवर्धक मधमाशी पालन करून जंगली तुळस आणि जांभूळ झाडांमधून मिळवलेले मध नाशिक येथील प्रदर्शनात विक्रीला ठेवण्यात आले आहे. नाशिककर नागरिक आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांनी ह्या अस्सल मधाची जोरदार खरेदी केली. शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळ यांच्या साहाय्याने इगतपुरी तालुक्यात जय मल्हार ग्रामविकास प्रतिष्ठान ह्या संस्थेमार्फत सह्याद्री मधाची निर्मिती केली जात आहे. आदिवासी महिलांना स्वयंरोजगार देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
नाशिक येथील गोल्फ क्लबवर सुरु असलेल्या प्रदर्शनात 60 क्रमांकाच्या स्टॉलवर मधाची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानपरिषदेचे माजी आमदार जयंत जाधव आदी उच्चपदस्थ नेत्यांनी इगतपुरीच्या मधाची चव चाखून आनंद व्यक्त केला. 8600042888 ह्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ह्या अस्सल मधाची नियमित व्यवस्था करण्यात आली आहे. जय मल्हार ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, जैवविविधता प्रकल्प समन्वयक भगीरथ भगत, माधवी तुपे, माधुरी भगत ह्यांच्याकडून मधाची माहिती आणि विक्री यांचे व्यवस्थापन केले जात आहे.