कारभारी दादांच्या नावाने शेतकऱ्यांना दिलेल्या पुरस्कारांची उंची सर्वोच्च पुरस्कारापेक्षा मोठी – आमदार हिरामण खोसकर : कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठानचा कृषी विज्ञान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28

संस्कार, संस्कृती आणि संयम ह्या त्रिसूत्रीने मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारे कारभारी दादा गिते हे शेतकऱ्यांचे मूर्तिमंत विद्यापीठ होते. त्यांचे अलौकिक मार्गदर्शन अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त आहे. कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठानने दादांच्या नावाने दिलेल्या दोन्ही पुरस्कारांची उंची सर्वोच्च पुरस्कारापेक्षा मोठी आहे असे प्रतिपादन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले. कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठान आयोजित कृषी विज्ञान पुरस्कार सोहळ्यात श्री. खोसकर बोलत होते. संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील प्रगतशील शेतकरी कारभारी ( दादा ) चिमाजी गीते यांच्या प्रथम स्मृतिप्रित्यर्थ बंगलोर येथील हॉर्टिकल्चर विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा रेड्डी व जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील प्रगतशील शेतकरी अजित घोलप यांना कृषी विज्ञान पुरस्कार वितरण करण्यात आला.

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, विधानपरिषद आमदार सुधीर तांबे, सिन्नरचे माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, हभप रामकृष्णदास महाराज लहवीतकर, जयश्री थोरात यांच्या हस्ते आज हा सोहळा संपन्न झाला. कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब गिते, पुणे येथील संशोधन आणि  विकास संस्था अर्थात एआरडीईचे शास्त्रज्ञ डॉ. लहानू गिते, नाशिकच्या जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते यांनी यावेळी विविध माहिती दिली. संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील आपलं सर्वस्व शेतीसाठी देणारे शेतकरी कारभारी चिमाजी गिते यांच्या प्रथम स्मृतिदिनापासून दरवर्षी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या व एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यासह एका शास्त्रज्ञाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठानने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी नामफलक अनावरण, कृषी दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले. ह्यावर्षीचा प्रथम पुरस्कार बेंगलोरच्या भारतीय हॉर्टिकल्चर संशोधन संस्थेतील वनस्पती रोग निदान विभाग प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा रेड्डी यांना देण्यात आला. टोमॅटो वरील टोपोव्हायरस ( टॉमॅटो लूज व पिवळे होणे ) यावर संशोधन व उपाय या विषयावर आशिया खंडात १५० च्यावर पेपर प्रकाशित केले. ओतूर येथील टोमॅटो व कांद्याचे एकरी विक्रमी उत्पादन घेणारे, शेत मजुराचा विमा काढणारे प्रगतशील शेतकरी अजित घोलप यांनाही कृषी विज्ञान पुरस्कार देण्यात आला. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!