संतस्वरूप सज्जन व्यक्तिमत्वे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरचे दिपस्तंभ आणि कल्पतरू ; स्व. कारभारी ( दादा ) गिते यांच्यासारख्यांचे नाव घेतले तरी पुण्य : हभप उद्धव महाराज चोले यांचे कीर्तनात सुंदर निरूपण

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28

संतस्वरूप सज्जन व्यक्तिमत्वे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरचे दिपस्तंभ आणि कल्पतरू आहेत. निरामय, निरपेक्ष स्नेह देणारे कारभारी दादांसारखे सज्जन व्यक्तिमत्व सर्वांना प्रगतीची वाटचाल करायला शिकवतात. लोकांच्या हृदयात असलेल्या पांडुरंगाशी एकरूप होऊन मनापासून सेवेचे पुण्यकर्म करतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी चांगले कर्म करून संतस्वरूप कार्याचा आलेख उभा केला असे कारभारी ( दादा ) गिते हे पूजनीय आहेत. म्हणून अशा सज्जनांचे नाव घेऊन गाठीशी पुण्य बांधावे. ह्या संतस्वरूप माणसांचे नुसते नाव घेतले तरी माणूस पुण्यवान होतो असे निरूपण प्रसिद्ध कीर्तनकार हभप उद्धव महाराज चोले यांनी संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथे केले. कृषी पंढरीचे वारकरी कै. कारभारी ( दादा ) चिमाजी गिते यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या कीर्तनसेवेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,
सज्जन व्यक्तींचे सानिध्य आणि त्यांच्या नावाचा जप केला तर आयुष्यातली पापे नाहीशी झाल्याशिवाय राहत नाही. कारभारी दादांनी शेती क्षेत्राची आणि समाजाची केलेली सेवा उत्तुंग असल्याने ते संतसज्जन ठरतात. त्यांच्या सेवाकार्याची उज्वल परंपरा पत्नी गं.भा. सुमनबाई कारभारी गिते, मुलगा भाऊसाहेब, लहानु, हरिभाऊ, मुलगी किसनाबाई, ठकुबाई आदींच्या माध्यमातून अविरत सुरु राहील असेही ते म्हणाले.

आपल्या सहज सुलभ ओघवत्या शैलीत हभप उद्धव महाराज चोले संतांची थोरवी वर्णन करण्यास वाणी अपुरी असल्याचे सांगत संतसंग हा सहज, फुकट मिळणारा मोठा लाभ आहे. संतांच्या पायी श्रद्धा ठेवणे, हा आयुष्यातील विश्रांतीचा डाव आहे असे सांगितले. निरूपणासाठी संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनांची नावे
नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फुकासाठी
विश्रांतीचा ठाव । पायी संताचिया भाव
तुका म्हणे पापे । जाती संताचिया जपे हा अभंग घेण्यात आला होता. संतांचा महिमा वर्णन करणाऱ्या ह्या अभंगात संतांचे नाव घ्यावे, पुण्य तर लाभतेच पण सर्व चिंता हरण होतात. मन निर्मळ होत जाते. आपला देवाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो असे त्यांनी विविध संदर्भ देऊन उपस्थित भाविकांना सांगितले. स्व. कारभारी ( दादा ) चिमाजी गिते यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी संगमनेर तालुक्यासह नाशिक आणि नगर जिल्ह्यातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. पत्नी गं.भा. सुमनबाई कारभारी गिते, मुलगा भाऊसाहेब, लहानु, हरिभाऊ, मुलगी किसनाबाई, ठकुबाई, कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठान यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!