लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
टिळकांनी गणेशोत्सव समाज जागृतीच्या हेतूने सुरू केला. ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची काळजी गणेशोत्सव मंडळाने घेणे गरजेचे आहे. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याचे भान ठेवून सामाजिक जबाबदारीने काम करावे असे आवाहन वाडीवऱ्हेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी केले. वाडीवऱ्हे येथे आगामी गणेशोत्सवानिमित्त शांतता कमटीची बैठक पार पडली. यावेळी कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सपोउनि रमेश अहिरे, रहीम शेख, पोलीस नाईक सोमनाथ बोराडे, प्रवीण काकड, विनोद चौधरी, निलेश मराठे, तुषार खालकर, विलास धारणकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले. यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरे करा असेही श्री. पवार म्हणाले. शासनाने यावर्षी सर्वच निर्बध शिथिल केल्याने गणपती बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात होणार आहे. गणेश मूर्तीची विटंबना होणार नाही याची दक्षता घ्यावी, विसर्जन प्रसंगी मिरवणूक काढावयाची असल्यास तसेच धरणावर गणपती विसर्जन करायचे असल्यास अगोदर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. यामुळे होणाऱ्या विपरीत घटनांना आळा बसेल. एक गाव एक गणपती राबवणेही गरजेचे असून कायदा व सुव्यवस्था राखावी, होणाऱ्या गणेश मंडळात कुणी मद्यपान करून आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही. यावेळी इगतपुरी उबांधकाम विभागाचे एन. एस. लांबोळे, वालदेवी धरणाचे हेमंत दीक्षित, मुकणे धरणाचे श्री. ठाकूर, महावितरणचे शांताराम घोलप, नागेश्वर पेटारकर, हिरामण नाठे, शिवराम बेडकुळे बाबा, पोलीस पाटील, तंटामुक्त सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.