
इगतपुरीनामा न्यूज, दि. 20
मुंबई आग्रा महामार्ग म्हणजे खड्ड्यांचे माहेरघर बनले आहे. अपघातांना कारणीभूत ठरणारे खड्डे लोकांच्या जीवाला घातक ठरू लागले आहेत. अनेक ठिकाणे मोठ्या अपघातांची संभाव्य केंद्रबिंदू होण्याची फक्त अधिकृत घोषणा होणे एवढेच बाकी आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेले दगड, भटके कुत्रे, तीव्र वळणे, घसरणाऱ्या अवस्थेतील रस्त्यांची स्थिती यामुळे लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. खराब रस्ते आणि जीवघेणे खड्डे वाहनांचे तयार फोडत असल्याच्या घटना वाढत आहे. यासह वाहने नादुरुस्त होणे, अपघातातून बचावणे आणि मालवाहतूक करणारी वाहने तिरपी होऊन पलटी होण्याच्या अवस्थेत येणे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खंबाळे पासून घाटनदेवी भागापर्यंत तर रस्त्यांची अत्यंत केविलवाणी अवस्था झाली आहे. लोकांकडून फक्त टोल वसुल करणारे टोल प्रशासन “कुंभकर्णी” झोपेतून जागे होणार ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. शिव्यांची लाखोली सुद्धा वाहिली जात असून संबंधितांच्या पितरांचाही चांगलाच उद्धार सुरु आहे. मोठ्या अपघातांची वाट पाहण्यापेक्षा युद्धपातळीवर महामार्ग दुरुस्ती हाती घेण्याची अत्यावश्यकता आहे अशी प्रतिक्रिया माजी सैनिक तथा रस्ते विषयक अभ्यासक हरीश चौबे यांनी दिली.
गोंदे ते इगतपुरी हा महामार्ग घोटी टोल प्रशासनाच्या तर गोंदे ते नाशिक हा महामार्ग पिंपळगाव बसवंत टोल प्रशासनाच्या ताब्यात आहे. मात्र ह्या दोन्ही टोल प्रशासनाकडून फक्त टोल वसुली जोरात सुरु असून रस्त्यांची अवस्था मात्र कोमात आहे. ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. वाहने घसरवणारी अवस्था असलेली ठिकाणे वाढली आहेत. घोटी पुलासाठी काम सुरु असून नियोजनाच्या नावाने मोठी बोंबाबोंब आहे. वारंवार तात्पुरत्या स्वरूपात मार्गीका करण्याच्या नादात खड्डे की रस्ते असा प्रश्न पडावा अशी भयानक परिस्थिती आहे. वाहतुकीचा खोळंबा, अपघाताची दाट शक्यता, जीवाला भीती, टायर फुटणे, चेंबर फुटणे आणि वाहनांची नादुरुस्ती अशा अनेक संकटांना नागरिक सामोरे जात आहेत. पिंप्री सदो फाट्यावर तर छोटे मोठे अपघात आणि वाहने बिघडण्याच्या घटना वाढत आहेत. परिणामी हा रस्ता भयानक आणि यमाच्या दारात नेऊ शकतो एवढी भयानकता आहे. वाहनांच्या दुरुस्तीकडे कोणाचेही लक्ष नाही. ह्या रस्त्याने मुंबईला जाणारे मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यापैकी कोणालाही या गंभीर विषयावर लक्ष द्यायला वेळ नाही. टोल प्रशासन मात्र टोल वसुलीकडे लक्ष केंद्रित करत असल्याने नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.