आश्रमशाळेत काम करणारा युवक भाजला : संबंधितांवर कारवाई करण्याची भगवान मधे यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 20

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी विकास विभाग संचालित मुंढेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत गरम वाफ उडाल्याने एक युवा कामगार भाजला आहे. दिपक सोमनाथ तिटकारे असे त्याचे नाव असून 10 टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. ह्या प्रकाराला संबंधित ठेकेदार, व्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केला आहे. तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भगवान मधे यांनी केली आहे.

दिपक सोमनाथ तिटकारे रा. भरवज, ता. इगतपुरी हा मध्यवर्ती स्वयंपाकगृहात भांडे घासण्यासाठी गेला. त्यावेळी स्टीमिंगची गरम वाफ त्याच्या अंगावर उडाली. त्यामुळे तो 10 टक्के भाजला असून भाजलेल्या ठिकाणी फोड आले आहे. ह्या घटनेनंतर त्याला उपचारासाठी पाठवण्यात आले. सध्या तो आपल्या गावी सुखरूप आहे. मात्र असे असले तरी बेजबाबदार व्यक्तींमुळे कामगारांचा जीव धोक्यात सापडतो. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केली आहे.