इगतपुरीनामा न्यूज, दि. 23
बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याप्रमाणे इगतपुरीच्या आदिवासी ग्रामीण भागात परिवहन महामंडळाची एसटी धावत आहे. सर्वसामान्य जनतेच्या हक्काची बस महामार्गावरून धावत असल्याचे दिसते. मुंबई आग्रा महामार्गावरून धावत असलेल्या एसटीतुन इगतपुरी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास मोठ्या प्रमाणात आहे. मात्र नाशिक ते इगतपुरी मार्गावर बसफेऱ्या अत्यंत काम आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सीबीएस ते इगतपुरीपर्यंत जादा बससेवेच्या फेऱ्या वाढवाव्यात अशा मागणीचे निवेदन इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना दिले. आमदार खोसकर यांनी ह्या मागणीबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले.
इगतपुरी तालुक्याच्या विविध गावांमधून शेकडो विद्यार्थी नाशिक सारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेण्यासाठी बसने रोज नित्यनियमाने प्रवास करतात. मात्र जादा बस फेऱ्या नसल्याने अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. एका दिवसात इगतपुरी तालुक्यातुन हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी बसने प्रवास करतात. मात्र परिवहन महामंडळाच्या पडत चाललेल्या वाहतुकीच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना खुप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अभ्यासाला वेळ मिळण्याऐवजी बसची वाट पाहण्यात त्यांचा बहुमोल वेळ वाया जातो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तात्काळ बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी दखल घेऊन बस फेऱ्या वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.