ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पंचक्रोशीमध्ये सकळ ऋषि मुनिजन व अखिल देवदेवता वन, वृक्षवल्ली, पक्षी, मृत्तिका, पाषाण व खड्याच्या रूपाने राहतात. कोट्यवधी पुण्यपावन तीर्थांचा रहिवास या पंचक्रोशीमध्ये आहे. अशी अत्यंत दैदिप्यमान, पुण्यपावन व त्रिभुवनैक पवित्र त्र्यंबकेश्वरची पंचक्रोशी आहे. श्रीमन्निवृत्तिनाथांना समाधि देण्यासाठी आलेले सर्व संतसाधु व देवदेवता हे सप्तशृंगावरून पंचवटीला आले. तेथून ते त्र्यंबकेश्वरास उजवी प्रदक्षिणा घेऊनच तीर्थक्षेत्र कावनईमार्गे हरिहरेश्वरास गेले. तेथून चक्रतीर्थ, कोटीतीर्थ करून त्र्यंबकेश्वरमध्ये आले. ही पंचक्रोशी प्रदक्षिणा त्यावेळी सर्वांनी केली. त्यानंतर अनेक साधुसंत, ऋषिमुनि, सिद्ध साधकांनी ही प्रदक्षिणा केली. आळंदी-पंढरी-त्र्यंबकेश्वराचे निष्ठावंत वारकरी वै. हभप आत्माराम महाराज नाशिककर यांनी अनेक वारकऱ्यांसोबत ही प्रदक्षिणा केली आहे. त्यांच्या ह्या व्रताला डोळ्यापुढे ठेवून समस्त महाराष्ट्रातील वैष्णवजन तथा नाशिक जिल्ह्यातील निष्ठावंत वारकरी मंडळींनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तथा श्रीमन्निवृत्तिनाथ महाराज पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा तीर्थयात्रा सोहळा आयोजित केलेला आहे. त्र्यंबकेश्वरावर तथा श्रीमन्निवृत्तिनाथांवर श्रद्धा असणाऱ्या भाविक भक्तांनी या प्रदक्षिणेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर, आळंदी, सासवड येथील पंचक्रोशी वारकरी सहभागी होणार आहेत. वारकरी भूषण ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली ), द्वाराचार्य रामकृष्ण महाराज लहवीतकर, विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष तथा आमदार हिरामण खोसकर, सरोज अहिरे व इतर वारकरी उपस्थित राहणार आहेत. ६ मार्चला सकाळी निवृत्तीनाथ मंदिर येथून परिक्रमेला सुरुवात होऊन अंजनेरीला विश्रांती व नाष्टा होईल. तळेगाव नाशिक येथे रात्रीचा पहिला मुक्काम, जातेगाव, दहेगाव, वाडीवऱ्हे, मुकणे मार्गे कावनई येथे दुसरा मुक्काम, तिसरा मुक्काम कळमुस्ते, पिंपरी त्र्यंबक येथे पाचवा मुक्काम, गणेशगाव ( नाशिक ) येथे सहावा मुक्काम होईल. १२ मार्चला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री संत जनार्दन स्वामी आश्रम येथे ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल. ह्या संपूर्ण सोहळ्यात काकड भजन, हरिपाठ, गवळणी, प्रवचन, व मुक्कामी वाटचालीचे कीर्तन होईल. ह्या सोहळ्याला वै. श्री. हभप आत्माराम महाराज नाशिककर आणि ह.भ.प. मठाधिपती माधव महाराज घुले, इगतपुरी यांचे आशीर्वाद लाभले आहेत.