बाजार समिती निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीच्या संचालकांना मतदानाचा अधिकार : तुल्यबळ रणधुमाळीमुळे मतदारांचा वधारणार भाव

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुका ह्या पूर्वीप्रमाणे होणार असल्याचे आलेल्या आदेशानुसार जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या हेतूने इच्छुकांनी लढल्या होत्या त्या फलद्रुप होतील असे दिसते आहे. गावागावातील सोसायटीच्या निवडणुकांसाठी संभाव्य इच्छुक उमेदवार आणि नेतृत्व करणाऱ्या नेत्यांकडून विशेष लक्ष घातले होते. यामुळे ग्रामीण राजकारण चांगलेच ढवळून निघालेले आहे. शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्याची बातमी असली तरी सहकार आयुक्त कार्यालयाच्या आदेशात यासंदर्भात उल्लेख नसल्याने ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी संचालकांचा भाव वधारला आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी बाजार समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवख्या सभासदांनी मातब्बर नेत्याविरोधात पॅनल निर्मिती करून निवडणुका लढविल्या. तर काही ठिकाणी नेत्यांच्या मध्यस्थीने बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. अनेक संस्था तोट्यात व अनिष्ठ तफावतीत असूनही फक्त आगामी बाजार समिती निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुका लढविल्या होत्या. मधल्या काळात बाजार समितीच्या निवडणुका थेट शेतकऱ्यांतून होतील असे वाटत असताना दुर्लक्षित झालेले सोसायटी संचालक आता नवीन आलेल्या आदेशामुळे  पुन्हा एकदा जोमात आल्यास नवल वाटायला नको. एकंदरीत इच्छुक व मतदार दोन्ही सक्रिय होताना आगामी काळात दिसून येईल. पॅनल निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असून व्युव्हरचना सुद्धा प्रगतीपथावर आहे. मागील निवडणुकीचे उट्टे काढण्यासाठी राजकारण तापणार असून यावेळी बाजार समिती निवडणुकीमुळे वातावरण तापणार आहे. याचवेळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने निवडणुक ज्वर सर्वांना दिसेल.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!