प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
इगतपुरी तालुका पर्यटनासह धार्मिक बाबतीतही अग्रेसर आहे. अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळांमुळेही इगतपुरी तालुक्याला विशेष महत्व आहे. त्यातच मुंबई आग्रा महामार्गावर पाडळी शिवारात जानोरी मार्गावर सिद्धीविनायक महागणपतीचे मंदिर आहे. ट्रस्टचे विश्वस्त संजय तुपसाखरे यांच्या संकल्पनेतुन साकारलेले हे श्री सिद्धिविनायक गणेशाचे मनमोहक, आकर्षक व निसर्गरम्य वातावरणात असलेले मंदिर श्री गणेश भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. गणेशोत्सव काळात हा परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून निघतो. उद्या गणपती विसर्जनाच्या दिवशी वाद्यांच्या गजरात पालखीतून मिरवणुक, दिवसभर महाप्रसाद व भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
महामार्ग व दोनही बाजुंनी लोहमार्ग यांच्या मध्यावर व निसर्गरम्य परिसराने नटलेल्या जानोरी मार्गावरील या सुवर्णमय रंगाने लक्ष वेधले जाणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणेश दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. या आकर्षक व मनमोहक मंदिरामुळे इगतपुरी तालुक्याच्या पर्यटनात भर पडली आहे. घोटी येथील सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात नामांकित व्यक्तिमत्त्व संजय अनंत तुपसाखरे यांनी आपल्या पाडळी जानोरी शिवारातील स्वतःच्या शिवारात श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर व मूर्तीची स्थापना केली आहे. मुंबईच्या सिद्धिविनायकाचे प्रतिरूप हे या ठिकाणच्या सिद्धिविनायक गणेशाच्या दर्शनरुपात पहावयास मिळते याचे गणेश भक्तांना समाधान आहे. तुपसाखरे परिवाराने अशा निसर्गरम्य परिसरात श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराची उभारणी करून इगतपुरी तालुक्यात तसेच परिसरातील नागरिकांना मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणेशाचे दर्शन घडविले.
या मंदिराची आकर्षक रचना, मूर्ती व निसर्ग सौंदर्याचा ठेवा पहाताच गणेश भक्तांचे मन भारावून जाते. सर्व संकष्ट चतुर्थी, प्रत्येक मंगळवार, गणेशजयंती, अंगारकी चतुर्थी, गणेशोत्सव आदी कालावधीत “श्री” च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले गेल्याने यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या गणेशोत्सव काळात महायज्ञ, महागणेशयाग, महापूजा, “श्रीं” ची पालखीतून सवाद्य मिरवणूक तसेच पालखीसोहळा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरती नंतर महाप्रसदांचेही आयोजन आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थी असल्याने पुन्हा येथे भाविकांची अलोट गर्दी होणार असुन श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिरामुळे पाडळी देशमुख पंचक्रोशीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.