
शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेत इगतपुरी वाडीवऱ्हे येथील वैभव दिलीप कातोरे यांनी उज्वल यश मिळवले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून असणाऱ्या वैभवने शेतीसह शिक्षणाला महत्व देऊन परिश्रम घेतले. यामुळे देशांतर्गत क्रिकेट सामन्यात पंच म्हणून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील १९७ उमेदवारांमधून वैभव दिलीप कातोरे याने ९६ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. ८० जणांत पुढील टप्प्याच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी त्याची निवड झाली होती. ऑगस्टमध्ये प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेत महाराष्ट्रातील ४८ उमेदवारांची निवड झाली. या एकंदर समग्र परीक्षेच्या अंतिम निकालात वैभव कातोरे यांनी महाराष्ट्रात ९२.५ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवला. त्यांचे मुळ गाव वाडीवऱ्हे ता. इगतपुरी असून ते शिक्षणानिमित्त सध्या पुणे येथे राहतात. या तरुणाची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच समिती ( एमसीए पॅनल ) वर नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्रभर होणाऱ्या राज्यस्तरीय खुल्या आणि विविध वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत त्यांना पंच म्हणून प्राधान्य मिळेल. त्यांच्या या निवडीमुळे इगतपुरी तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.