लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक
इगतपुरी तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यांत शिक्षणाची दारणामाई ज्यांच्यामुळे वाहत आहे असे इगतपुरी तालुक्याचे अग्रणी शिक्षणमहर्षी लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे यांचे वारसदार ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांचा मविप्र संचालकपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी ऐतिहासिक विजय झाला. अनेक संकटे, दबा धरून बसलेले विरोधक, अनेक कारस्थाने आदींच्या नाकावर टिच्चून ॲड. संदीप गुळवे यांनी निवडणुकीच्या घनघोर युद्धात मिळवलेला विजय म्हणजे लोकनेते दादासाहेबांच्या विचारांचा खूपच मोठा विजय आहे. प्रस्थापितांना आयुष्यभर ज्या गुळवे परिवाराने पदांची चव चाखायला दिली अशा लोकांना या निवडणुकीच्या निमित्ताने खूप मोठा धडा शिकवला गेला आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात ॲड. संदीप गुळवे आणि त्यांच्या परिवाराचे अनेक वर्षांचे योगदान पाहता मविप्र संचालक म्हणून त्यांची कारकीर्द निश्चितच उजळ ठरणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने गुळवे परिवाराच्या नावाचा करिष्मा पुन्हा एकदा ह्या जिल्ह्याला पाहायला मिळाला. ॲड. संदीप गुळवे यांच्या विक्रमी विजयामुळे इगतपुरी तालुक्याला भक्कम नेतृत्व आणि तालुक्याला पुढे घेऊन जाणारा दूरदृष्टी असलेला लोकनेता लाभला असल्याने त्यांचे अभिनंदन सर्वत्र सुरु आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक ही नाशिक जिल्ह्यातीळ अतिशय महत्वाची आणि शैक्षणिक कार्यात मौलिक योगदान असणारी जुनी संस्था आहे. ह्या संस्थेच्या निवडणुकीत ॲड. संदीप गुळवे हे इगतपुरी तालुका संचालक पदासाठी उभे होते. वास्तविक विरोधकांनी स्वतःहून ॲड. संदीप गुळवे यांना बिनविरोध संधी द्यायला हवी होती. एकप्रकारे अशी संधी देऊन उपकार वगैरे केल्याची भावना निर्माण झाली असती. म्हणून समोरासमोर निवडणूक एकदाची पार पडली आणि गुळवे नावाचा करिष्मा लोकांना पाहायला मिळाला. ॲड. संदीप गुळवे यांनी 5 हजार 262 मतांनी निवडून येत स्व. लोकनेते दादासाहेब गुळवे यांचा खऱ्या अर्थाने सक्षम आणि भक्कम वारसदार असल्याचे सिद्ध करून दाखवले. इगतपुरीसह जिल्हाभरात ॲड. गुळवे यांनी कमावलेली माणसे आणि यंत्रणा यांची अभेद्य साथ, परिवर्तन पॅनलचा दमदार विचार आणि दादासाहेबांचा आशीर्वाद याच्या आधारावर ॲड. संदीप गुळवे यांनी घेतलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे. यनिमित्ताने इगतपुरी तालुक्याला त्यांच्यासारखे दूरदृष्टी आणि शिक्षणाचा दूरगामी वारसा असलेले बावनकशी नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीला “इगतपुरीनामा” परिवारातर्फे भरभरून हार्दिक शुभेच्छा..!