घोटी बाजार समितीचे विद्यमान प्रशासक मंडळ बरखास्त : सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांची शासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज, दि. 22

नाशिक जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासकीय प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेले अशासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांची शासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सतीश खरे यांनी निर्गमित केले आहे. घोटी बाजार समितीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांना आदेशीत करण्यात आले आहे. दरम्यान काही काही महिन्यातच घोटी बाजार समितीच्या निवडणुका होणार असल्याने आज झालेल्या प्रशासक नियुक्तीला खूप महत्व आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सतीश खरे यांनी विद्यमान अशासकीय प्रशासकीय मंडळातील सदस्यांना त्यांच्याकडील कामकाज हस्तांतर करण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे. बाजार समिती निवडणुकीत विद्यमान प्रशासकीय मंडळातील व्यक्तींकडून हस्तक्षेप होऊ नये यासाठी शासकीय प्रशासक नियुक्ती केली असल्याची चर्चा इगतपुरी तालुक्यात होत आहे.