इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात इगतपुरी तालुक्यातून धारगाव तसेच ओंडलीची निवड करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणार असून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आहे. या योजनेसाठी जिल्हा स्तरीय समितीने ह्या गावांसाठी 12 लाख 82 हजार रुपयांचा प्रकल्प आराखडा मंजूर केला आहे. त्यात सर्वसाधारण लाभार्थीसाठी 7 लाख 82 हजार, अनुसूचित जातीसाठी 1 लाख 60 हजार व अनुसूचित जमातीसाठी 3 लाख 40 हजार मंजूर करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी धारगाव व ओंडली सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थ शेतकरी यांची सभा घेण्यात आली. एकात्मिक शेती पद्धतीतून कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास व कृषी आधारित पूरक उद्योगधंद्याची योग्य सांगड घातल्यास उत्पादकतेत वाढ करणे शक्य होईल. हवामानातील अनपेक्षित बदलामुळे नुकसान कमी करता येईल असे प्रतिपादन इगतपुरी मंडळ कृषी अधिकारी एम. डी. रोंगटे यांनी केले. या योजनेत बावीस गायी/म्हशीसाठी ८.२० लक्ष, काढणी पश्चात तंत्रज्ञान पॅक हाउस बांधण्यासाठी 2 लक्ष व संरक्षित शेती अंतर्गत शेडनेट हाउससाठी २.६२ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी केले आहे.