इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
मुंबई आग्रा महामार्गावर कसारा जुन्या कसारा घाटातील रस्त्याला तडे गेल्याचे आढळून आले आहे. दोन वर्षांपूर्वी ह्याच रस्त्याला भेगा पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचे यनिमित्ताने दिसून येत आहे. तडे गेलेल्या भागात पावसाचे पाणी जाऊन रस्ता खचत असल्याने मोठी आपत्ती निर्माण होण्याची भीती उभी राहिली आहे. यासह संरक्षक कठडे पाऊस आणि तडे यामुळे रस्त्यापासून बाजूला सरकत आहेत. ह्या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून घाबरत घाबरत वाहने चालवली जात आहेत. तडे गेलेल्या रस्त्यावर तातडीजे उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असून तोपर्यंत एकेरी वाहतुकीचा पर्याय वापरणे आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या कामांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असे मत वाहनधारक व्यक्त करीत आहेत. रस्त्याला गेलेला तडा परस्परांपासून विलग झाल्यास कसारा घाटात गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागू शकते अशी स्थिती आहे.
मुंबई नासिक महामार्गांवरील जुन्या व नवीन कसारा घाटात दोन वर्षांपूर्वी देखील असा प्रकार घडला होता. मागील वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून दुरुस्ती केली. पण निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारामुळे आज पुन्हा कसारा घाटातील रस्त्याला तडे गेलेत. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत घालून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.
- शाम धुमाळ, अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा