इगतपुरीनामा न्यूज, दि. २
साप म्हटला की अनेकांना दरदरून घाम फुटतो तर काहींची बोबडी वळते. यापूर्वी सापांविषयी अनेक गैरसमज असल्याने ‘दिसला की ठेचला’ या वृत्तीने मारले जायचे. सापांविषयी गैरसमज दूर व्हावेत, लोकांचे प्रबोधन व्हावे आणि सापांना जीवदान मिळावे यासाठी मध्यंतरी सर्पमित्रांनी मोहीम हाती घेऊन सर्प वाचविण्यासाठी प्रयत्न केलेत. या मेहनतीचे फळ आता ग्रामीण भागात दिसू लागले असून, साप न मारता सर्पमित्रांना बोलावून जीवदान दिले जात आहे. साप पकडल्यास पेट्रोल खर्च म्हणून थोडेफार पैसे नागरिक सर्पमित्रास देतात. तर काही सर्पमित्र ते पैसे देखील नाकारतात. अन्नसाखळीतील महत्वाचा दुवा असणाऱ्या आणि शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सापांना निसर्गात सोडल्याचा आनंद हेच त्यांचे मानधन असे काही सर्पमित्र सांगतात. परंतु, सध्या स्वयंघोषित सर्पमित्रांनी मात्र यात धंदा शोधला आहे. सर्प पकडण्यासाठी पाचशे ते हजार रुपयांची मागणी केली जात आहे. शिवाय यात कोणतेही प्रशिक्षण नाही, संरक्षण साधने नाहीत, सर्पदंश प्राथमिक उपचार बाबत माहिती नसल्याची धक्कादायक बाब समजते आहे. अशा अर्धवटरावांचा जीव देखील धोक्यात असल्याची जाणीव देखील यांना नाही. वन विभागाने अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या सर्पमित्रांवर कारवाई करण्याची गरज आहे.
सापास बाटलीत कोंबणे, फुत्कार टाकणारे साप बरणीत भरणे, धामण सारख्या मोठ्या सापांना हालचाल न करता येणाऱ्या छोट्या बरणीत ठेवणे, फुत्कारणाऱ्या नागांना शिक्षा म्हणून उपाशी ठेवणे असे प्रकार या अज्ञानी सर्पमित्रांकडून घडतात. त्यामुळे सापांची देखील मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. पकडलेल्या सापांचे पुढे काय होते ? याचे उत्तर देखील कुठे मिळत नाही. स्वयंघोषित सर्पमित्रांचे पैसे कमविण्याचे साधन देखील झालेे आहे. पाचशे ते हजार रुपये आकारणाऱ्या सर्पमित्रांशी नागरिकांचे खटके उडतात. पैसे द्या नाहीतर साप सोडतो, अशी धमक्या मिळाल्याचे किस्से ऐकिवात आहेत. परिणामी, सर्पमित्रांना न बोलविता सर्पहत्या करण्याचे प्रमाण वाढीस लागण्याची शक्यता आहे. तळमळीने जनजागृती करून सर्प वाचविण्याची मोहीम उभी करणाऱ्या सर्पमित्रांना मात्र असल्या प्रकाराने त्रास सहन करावा लागत आहे.
सोशल मिडीयाचे लाईक्स जिवापेक्षा जास्त का ?
सापाशी खेळणे, नागांना डुलायला लावणे, विषारी सर्प हातात घेऊन फोटो काढणे, सापांना दूध पाजणे, साप गळ्यात घालून फोटो काढणे, नागाच्या फण्याचे चुंबन घेणे असे धोकादायक फोटो क्लिक करत ते फोटो सोशल साईट्सवर अपलोड करतात, लाईक मिळवितात. ह्या युवकांनी फेसबुक, इन्स्टाग्रामवर स्वतंत्र अकाउंट तयार करून ‘सर्पमित्र’ ही स्वयंघोषित उपाधी बहाल केली आहे. सक्रिय दिसण्यासाठी प्रत्येक सापासोबत फोटो काढणे आणि सोशल मीडियावर अपलोड करणे तरुणांसाठी प्रतिष्ठा झाली आहे. बिनबोभाट सर्व चालले असले तरी, जिवापेक्षा आभासी जगतातील लाईक्स जास्त आहेत का ? याचा विचार देखील या मुलांना करावा लागणार आहे.
स्वयंघोषित सर्पमित्रांचे शुल्क किती ?
साप न सापडल्यास पेट्रोल खर्च : 200
बिनविषारी साप -300 ते 400
नाग -500 ते 1000