१५ वर्षांपासून वारकरी पताका खांद्यावर घेऊन आषाढी वारी करणारे उत्तमराव झनकर : आळंदी ते पंढरपूर दिंडीत सहभाग घेऊन घेतात वारीचा आनंद

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

भेटी लागे जिवा लागलीसे आस”  या अभंगाप्रमाणे विटेवर उभ्या असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची आस आषाढी एकादशीच्या निमित्ताने सदैव वारकऱ्यांना नेहमीच लागलेली आहे. या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील वारकरी संप्रदायाची पताका हाती घेतलेले माजी सरपंच उत्तमराव झनकर ओळखले जातात. ते गेल्या १५ वर्षांपासून त्यांची पत्नी सौ. रंजना यांच्यासह पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत पायी वारी करीत हरिनाम आणि दिंडीचा आनंद घेत आहेत. यावर्षी ते ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी ते पंढरपूर दिंडीत सामील झाले आहे.

लहानपणापासूनच धार्मिक कार्याची आवड असलेले झनकर पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहेत. दररोज न चुकता पांडुरंगाचे चिंतन करीत असतात. न चुकता हरिपाठ, भजन, कीर्तन श्रवण करून परमेश्वराची सेवा करतात. गोरगरिबांची सेवा हीच विठ्ठलसेवा आहे या न्यायाने शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या झनकर यांना गोरगरिबांची जाणीव आहे. माणसामध्येच खरे परमेश्वराचे अस्तित्व असून भुकेल्या व्यक्तींना अन्नदानही करीत असतात. परमेश्वराने दिलेल्या या अनमोल देहाचा चांगला उपयोग करून गोरगरिबांच्या सेवेत व परमार्थिक कार्यात सत्कारणी लागला पाहिजे. आई वडिलांचे पूजन दर्शन हे महत्वाचे असून खरा परमेश्वर त्यांच्यामध्ये आहे. जोपर्यंत हृदयात श्वास आहे तोपर्यंत परमेश्वराची भक्ती, पायी दिंडी वारी करणार असल्याचे उत्तमराव झनकर यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!