इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असणाऱ्या खैरगांव शिदवाडी इथल्या आदिवासी ठाकूर कुटुंबातील पल्लवी चंदर झुगरे हिने बेताच्या परिस्थितीवर मात केली आहे. खैरगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल ह्या शाळेत दहावीच्या परीक्षेत तिने ८० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण आघाणवाडी या शाळेत झाले. घरी परिस्थिती अतिशय बेताची असल्याने आईसोबत मोलमजुरी करून मिळेल त्या वेळेत मन लावून शाळा आणि अभ्यास करायची. काही दिवसांपूर्वी कावजी सोमनाथ भले यांच्या प्रयत्नांतून ग्रामपंचायत खैरगाव व राया ठाकर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातही तिने प्रथम क्रमांक मिळविला होता.
वडील व्यसनाच्या आहारी गेले असल्यामुळे घरी ताणतणावाचे वातावरण असायचे. तरीही तिनं आपली चिकाटी न सोडता अभ्यास सुरु ठेवला. अनंत अडचणी असूनही तिने मिळवलेले नेत्रदीपक यश कौतुकास्पद असल्याचे खैरगावचे लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण यांनी सांगितले. पल्लवीने मिळवलेल्या यशाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. पुढील शिक्षणासाठी तिला सरपंच ॲड. मारुती आघाण, कावजी सोमनाथ भले यांच्यासह गावातील सुशिक्षित तरूण योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत.