इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
घोटीतील प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक गेल्या दोन दशकापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन तसेच मराठी पारंपारीक सण, उत्सव महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर साजरा करीत असतात. यातून ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन होऊन इतिहास जपला जावा व गडकिल्ल्यांविषयी जनजागृती व्हावी या ऊद्देशाने कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक उत्सव साजरा करीत असतात. यावर्षी कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी घोटी येथून १५० किमी अंतरावर असलेल्या सटाणा तालुक्यातील इतिहासकालीन प्रसिद्ध मुल्हेर किल्ल्यावर जाऊन तिरंगाचे ध्वजारोहण करून ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. मुल्हेर गड, मोरगडाच्या पायथ्याशी असलेल्या जाखोडवाडीच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळासाहेब आरोटे, काळू भोर, गजानन चव्हाण, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, सुरेश चव्हाण, गोकुळ चव्हाण, दीपक कडू, भगवान तोकडे, आदेश भगत, सोमनाथ भगत, उमेश दिवाकर, पुरुषोत्तम बोराडे, गोविंद चव्हाण, बाळासाहेब वाजे, संदीप खैरनार, जान्हवी भोर, चतुर्थी तोकडे, सृष्टी खैरनार, संतोष म्हसणे, लक्ष्मण जोशी, राजू जोशी, रतन कडू, पांडुरंग भोर, रुद्र हेमके, कृष्णा बोराडे, पुष्कर पवार, व्यंकटेश भोर, गणेश बागुल, महेश बागुल आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.
साल्हेर किल्ल्याचा इतिहास
सटाणा तालुक्यातील सेलबारी, डोलबारी डोंगर रांगेतील ४२९० फूट उंचावर ” मुल्हेर किल्ला ” आहे. मुल्हेर गाव महाभारत कालीन असुन त्याचे नाव ” रत्नपूर ” होते. मुल्हेर किल्ला बागुल राजांनी बांधला. इ. स. १३०८ ते १६१९ पर्यंत बागुलांनी राज्य केले. त्यानंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. दुसऱ्या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली त्यात १६७२ मध्ये मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. त्यानंतर पुन्हा हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे इ. स. १७५२ च्या भालकीच्या तहा नुसार मुल्हेर सकट खान्देश मधील सर्व प्रदेश मराठयांच्या ताब्यात आला. १५ जुलै १८१८ मध्ये मुल्हेर किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला असा इतिहास आहे.