
इगतपुरीनामा न्यूज – दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कामानिमित्त अनेक शासकीय कार्यालयांत चकरा मारून ताटकळत उभे राहावे लागते. त्यांच्यावर साधे कुणाचेही लक्ष जात नाही. माऊली फाउंडेशनचे संस्थापक विनायक काळे हे दिव्यांगांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. त्यानुसार त्यांनी पिंपळगाव मोर येथील काही दिव्यांग बंधू भगिनींना स्वावलंबन कार्ड म्हणजेच युडीआयडी कार्डसाठी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य केले. दिव्यांगांच्या अडचणी लक्षात घेत त्यांनी सर्वांना आपल्या स्वतःच्या वाहनात बसवून जिल्हा रुग्णालयात नेले. दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील डॉ. कुटे यांच्याशी संपर्क साधून यूडीआयडी कार्ड मिळण्यासाठी पाठपुरावा करून संपूर्ण प्रक्रिया करून घेतली. येत्या आठवडाभरात सर्वांना युडीआयडी कार्डचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या सहाय्याबद्धल आदिवासी दिव्यांग व्यक्तींनी कृतज्ञता व्यक्त केली. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रेरणेने विनायक काळे वंचितांना नेहमीच मदत करीत असतात. यापुढेही शासकीय योजनेपासून वंचित असणाऱ्या दिव्यांगांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे विनायक काळे यांनी सांगितले. याप्रसंगी लहानुबाई माळी, चांगुणा बेंडकोळी, पंगाजी ढवळे, अलकाबाई भवारी आदी दिव्यांग बंधूभगिनी उपस्थित होते.