रोटरी क्लब नॉर्थ मुंबईतर्फे गरजूंना शालेय साहित्य, सायकल आणि शिष्यवृत्तीचे झाले वाटप

धनराज म्हसणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

रोटरी क्लब ऑफ नॉर्थ मुंबई, डी. एल. शहा ट्रस्ट यांच्या विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील होतकरू आणि गरजू गरीब विद्यार्थ्यांना ४० सायकलींचे वाटप करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. टिटोली जिल्हा परिषद शाळेत साहित्य व शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. देशाच्या उत्थानासाठी महिलांचं सबलीकरण करणं अत्यावश्यक असल्याचे रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थच्या अध्यक्ष रुकसाना खान यांनी यावेळी सांगितले.

इगतपुरी प्रकल्पाचे संस्थापक सदस्य असीम नागरी यांनी गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आमच्याकडून कायमच मदतीचा हात दिला जाईल असे आश्वासित केले. यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या खेळ कला  गुणांचा विकास करण्याच्या हेतूने क्रीडा संकुल उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी खास रोटरी क्लब नॉर्थ मुंबईकडून मेहुल शहा यांनी इगतपुरी तालुका क्रीडा संकुलाची पाहणी केली. क्रीडा प्रशिक्षक राहुल पंडित यांच्याशी सकारात्मक चर्चा करून तेथील सुविधांचा आढावा घेतला. संकुलाला सर्वोतोपरी मदत करून ग्रामीण भागातील खेळाडू राज्य व देश पातळीवर नेण्याचा हेतूने माहिती घेतली. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनीही ग्रामीण भागात संकटे कितीही मोठी असली तरी आपण मात्र शिक्षक, नानाविध प्रकारच्या सेवाभावी संस्था व आठ वर्षापासून तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी झटणाऱ्या रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्व संकटे दूर करण्यासाठी सज्ज झालो आहोत असा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा गिरणारे श्रीजा गणेश धोंगडे, हिना रोहिदास गोईकणे, जिल्हा परिषद शाळा कांचनगाव हिरामण रंगनाथ भगत, रोशन रामदास भटाटे, जिल्हा परिषद शाळा पेहरेवाडी चंद्रकांत दादू खडके, शेखर धोंडू खडके, जिल्हा परिषद शाळा टिटोली समीक्षा रवींद्र राऊत, अंकिता सुभाष खडके, जिल्हा परिषद शाळा फांगुळगव्हाण कोमल पांडुरंग म्हसणे, मनीष शिवाजी पंडित या होतकरू, गरीब, गुणवंत १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आले. जिल्हा परिषद उर्दू शाळा इगतपुरी येथील विद्यार्थ्यांना क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम हॉलीबॉल, फुटबॉल या खेळांचे क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले. घरापासून दूरच्या अंतरावर शाळेपर्यंत जाण्यासाठी गरजवंत चाळीस विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. शालेय दप्तर, पाण्याच्या बाटल्या व मुलींच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. माजी सभापती विठ्ठल लंगडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नगरसेवक संपत डावखर, सरपंच अनिल भोपे, खादी ग्रामोद्योगचे संचालक भगीरथ भागात, विनोद भागडे, मारुती गोईकणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्प समन्वयक वैभव गग, सहकारी धनराज म्हसणे, गोकुळ आहिरे, मंगला शार्दुल, गोरख तारडे, सतीश टेकुडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अवधूत खाडगीर यांनी तर आभार अनिल भोपे यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!