इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण, हिंदू बांधवांच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय तृतीया आणि हिंदूरत्न संभाजी महाराज जयंती हा त्रिवेणी संगम साधून घोटीच्या कळसुबाई मित्रमंडळाने कोरोना योद्धयांचा सन्मान केला. संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध गिर्यारोहक भगीरथ मराडे यांच्या संकल्पनेनुसार इगतपुरी येथे कोविड नियमांचे पालन करून सोहळा संपन्न झाला. एक वर्षांपासून आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात कोरोनाशी अविरत लढा देणारे असंख्य योद्धे आहेत. ह्यापैकी अनोखी कामगिरी करून जनमानसाला भयमुक्त करणाऱ्या विशेष व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील योद्ध्यांना त्रिवेणी संगम साधून त्यांचे कौतुक केल्याने आगामी काळात कार्याची ऊर्जा मिळाल्याचे सत्कारमूर्तींनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यात गेल्या एक वर्षांपासून अखंडपणे कोरोनाच्या मैदानात उतरून अनेकजण लढा लढत आहेत. रुग्णसेवा, प्लाझ्मादान, रक्तदान, बेडची उपलब्धता, रेमडीसीविर उपलब्धता, ऑक्सिजन, कॉन्सेनट्रेटर यंत्र, औषधें, अन्नधान्य वाटप, रुग्णवाहिका, समुपदेशन, जनजागरण, वृत्तांकन आदींच्या माध्यमातून कोरोना महामारी काळात कोरोना योद्धे लढत आहेत. ह्या कोरोना योद्ध्यांमुळे शेकडो लोकांना विविध प्रकारचे मदतकार्य सातत्याने मिळते आहे. यांच्या कार्याला सलाम करून बळ देण्यासाठी घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी संकल्प केला. त्यानुसार रमजान, अक्षयतृतीया, संभाजी महाराज जयंती ह्या पर्वाचा त्रिवेणीसंगम साधून इगतपुरी येथे गौरव समारंभ घेण्यात आला. संकटकाळात पाठीवर थाप मिळाल्याने सामाजिक कार्य करायला नवनागांचे बळ मिळते असे सत्कारमूर्तींनी यावेळी म्हटले.
घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध गिर्यारोहक भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन चव्हाण, बाळासाहेब आरोटे, प्रवीण भटाटे, काळू भोर, अशोक हेमके, अभिजित कुलकर्णी, महेंद्र आडोळे, बाळा दुभाषे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शिवसेना नेते कुलदीप चौधरी, डॉ. अक्षय माघाडे, विस्ताराधिकारी एस. बी. शेळके, सामाजिक कार्यकर्ते किरण फलटणकर, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, डॉ. पारस चोरडिया, रुग्णवाहक नंदू जाधव, रहीम शेख, मेहमूद सय्यद, अस्लम शेख, भास्कर हिंदे, विजय गुप्ता, पत्रकार पोपट गवांदे, भास्कर सोनवणे, वाल्मिक गवांदे, विकास शेंडगे, शैलेश पुरोहित, विकास काजळे, राजू नेटावटे, जाकीर शेख, गणेश घाटकर, उद्धव मोराडे आदींना कोरोना योद्धा प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.