ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे कोरोनाच्या सावटाखाली सोमवारी पहाटे पावसात राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरकडे प्रस्थान झाले. पहाटेच्या वेळी प्रारंभी संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरात भजन, आरती होउन टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांच्या पादुका कुशावर्त येथे नेण्यात आल्या. तेथे स्नान घालुन नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते पादुकांचे पुजन करण्यात आले. त्यानंतर त्र्यंबकराज मंदिराच्या महादरवाजासमोर अभंग गायन होऊन तेथून पालखी शिवशाही बसने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जेष्ठ नेते संपतराव सकाळे, तहसीलदार दिपक गिरासे, प्रशासकीय समितीचे सदस्य तथा सहाय्यक धर्मदाय आयुक्त कृष्णा सोनवणे, पो. नि. संदिप रणदिवे आदी उपस्थित होते.
बस संस्थानमार्फत फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती. पालखी सोबत जाणाऱ्या वारकऱ्यांना मास्क व सॅनिटायझर पुरवण्यात आले असुन सोबत पोलीस व आरोग्य पथकही असणार आहे. भाविकांनी गर्दी करु नये यासाठी सकाळ पासुनच मंदिरा बाहेर मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. बॅरीकेडींग लावुन मंदिरात जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला. यादीप्रमाणे निमंत्रितांची नावे बघुनच मंदिरात प्रवेश दिला जात होता.
सकाळी समाधीची नित्य पुजा झाल्यावर पालखीचे मानकरी ह. भ. प. मोहन महाराज बेलापुरकर व ह.भ.प. बाळकृष्ण महाराज डावरे, इतर मानाच्या दिंड्यांचे प्रतिनिधी आदींना देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देण्यात आला. ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी यांनी अभंग गायन केले. प्रस्थानाच्या अभंगासह धन्य धन्य निवृत्तिदेवा हा अभंग म्हणण्यात आला. श्रींच्या चांदीच्या पादुका व प्रतिमा समाधी जवळ ठेवून आरती करण्यात आली. त्या नंतर उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष केल्यावर नाथांची प्रतिमा व पादुका सजविलेल्या पालखित ठेवून भजन कीर्तन करीत पालखीची मंदिर ओवरीतच प्रदक्षिणा करण्यात आली. या वेळी पालखी खरोखरी पंढरीस पायी निघाल्याचे भक्तीमय वातावरण होते. दरवर्षी आषाढी एकादशीच्या २६ दिवस अगोदर त्र्यंबकेश्वर येथुन संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायी दिंडी लाखो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान करते. मात्र मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता शासनाने पायी वारी परवानगी नाकारल्याने शिवशाही बसमधून पालखी पंढरपूरला ४० वारकऱ्यांसह जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या सोहळ्यास संस्थान प्रशासकीय समितीचे सदस्य तथा सहाय्यक धर्मदाय आयुक्त कृष्णा सोनवणे, पो. नि. संदिप रणदिवे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, माजी विश्वस्त पवन भुतडा, पुंडलिक थेटे, ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, पंडित महाराज कोल्हे, ललिता शिंदे, संजिवन समाधीचे वंशपरंपरागत पुजारी ह.भ.प. अनिल महाराज गोसावी, ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, ह.भ.प. योगेश महाराज गोसावी, ह.भ.प. अविनाश महाराज गोसावी, सच्चिदानंद गोसावी, अद्वैत गोसावी, मानकरी व वारकरी उपस्थित होते. पो. नि. संदिप रणदिवे, स.पो.नि. अश्विनी टिळे व त्यांचे सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यंदा विनामूल्य बस : पालखीचे कुठेही स्वागत नाही
मागील वर्षी परिवहन महामंडळाकडून एक शिवशाही बस उपलब्ध करून देताना ७१ हजार रूपये भाडे घेतले होते. याने वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. याशिवाय बस सजवण्यात आली नव्हती. त्याचे पडसाद उलटल्यानंतर महामंडळाकडून भाडे परत देण्यात आले होते. यंदा दोन शिवशाही बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. शिवशाही बसमधून जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असुन सदर बस मार्गात कुठेही थांबणार नाही. त्यामुळे पालखीचे कुठेही स्वागत होणार नाही. बस सारथ्य करण्याचा मान हा चालक शशिकांत ढेपले, नितीन जाधव, प्रशांत पाटील व प्रमोद भुजबळ यांना मिळाला आहे.
पालखी सोबत या वारकऱ्यांना संधी
पालखी सोबत शिवशाही बस मधुन ४० वारकऱ्यांना जाण्याची संधी मिळणार आहे. त्यात मानकरी मोहन महाराज बेलापुरकर, बाळकृष्ण डावरे, जयंत महाराज गोसावी, रविंद्र काकड, सोपान महाराज गोळेसर, सोपानकाका हिरवे, मोहन जाधव, सूर्यभान कडलग, भीमराज कांदळकर, खुशाल चवंडगीर, गंगाधर काकड, राजाराम गाडे, कृष्णा कमाणकर, संतोष सोमवंशी, भगीरथ काळे, नारायण पाटील, गोरख पाटील, शरद मत्सागर, कारभारी पोटे, संपत थेटे, उत्तम आडके, प्रकाश केदार, वसंत गटकळ, बापूसाहेब मोरे, पांडुरंग जाधव, सतीश मोरे, रमेश खुळे, पुजारी सच्चिदानंद गोसावी, रश्मी गोसावी, ज्ञानेश्वरी धारणे, चोपदार निवृत्ती मेमाणे, झेंडूची ज्ञानेश्वर दाते, रामदास थेटे, वीणेकरी अर्जुन गाढवे, संस्थान कर्मचारी गंगाराम झोले, संदिप मुळाणे, धर्मादाय खात्याचे निरिक्षक पंडितराव झाडे, मुख्याधिकारी संजय जाधव, संस्थान प्रशासक ॲड. भाऊसाहेब गंभीरे, सहाय्यक आयुक्त के. एम सोनवणे यांचा समावेश आहे.