

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक
मोठ्या अपेक्षेने घेतलेले उच्चशिक्षण, त्याद्वारे मिळालेली शिक्षकाची बिनपगारी नोकरी आणि यामुळे स्वकीय लोकांकडून तिरकस मनोवृत्तीची मिळत असलेली वागणूक यामुळे व्यथित झालेल्या युवकाची यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहे. मागे वळून पाहतांना ह्या युवकाने इगतपुरी तालुक्यातील ५०० लोकांना हक्काचा आणि कायम उत्पन्न मिळवून देणारा रोजगार मिळवून दिला आहे.शिक्षक असूनही सकाळी ८ ते १० शेळ्या चारायला, ११ ते ५ बिनपगारी शाळेत शिकवणे आणि शाळेतून आल्यावर रात्री ७ वाजेपर्यंत पुन्हा शेळया चारणे असा दिनक्रम असणारा हा अवलिया शिक्षक अनेक कुटुंबासाठी रोजगार मिळवून देणारा दाता ठरला आहे. कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करता निश्चित केलेले ध्येय पूर्ण करता येते आणि त्यातूनच भरघोस उत्पन्न मिळवून अनेक लोकांना पुढे नेता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर जाधववाडी येथील भास्कर नामदेव जाधव यांची ही उल्लेखनीय यशोगाथा आहे. सहकारी दत्तात्रय कुंदे यांच्या सोबत संपूर्ण तालुका पायाखाली घालून शेळीपालकांच्या भेटी, समस्या सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.


भास्कर जाधव यांनी सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातुन साधारण परिस्थिती असतांनाही पदव्युत्तर पदवी आणि खूप आशेने शिक्षणशास्त्र पदवी घेतली. विनाअनुदानित शाळेत नोकरी मिळाल्यावर कुटुंबाला आपला मुलगा शिक्षक झाला याचा खूप आनंद अभिमान वाटला. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण अनेक वर्ष नोकरी करूनही पगार सुरु झाला नाही. यामुळे भास्कर जाधव हे खचत चालले होते. जगण्यासाठी आता करावे तर काय करावे ? एवढे शिक्षण घेऊन शिक्षकाची नोकरी तर लागली परंतु पगार नाही. ही नोकरी सोडून पुन्हा शेती किंवा एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करणे हे पण आता लोक काय म्हणतील या विचाराने केवळ अशक्य होते. अडचणीच्या काळात आईने पाळलेल्या शेळ्या आणि त्यामुळे कुटुंबाला मिळालेला आधार पाहून भास्कर जाधव यांनी शेळीपालन करण्याचा दुरगामी निर्णय घेतला. आता माघार नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही असे ठरवून शेळीपालन करण्याचे निश्चित झाले. भास्कर जाधव यांनी सुरुवातीला आपल्या तालुक्यासह शेजारचे अन्य तालुके, जिल्हे आणि तेथील शेळी पालकांच्या भेटी घेतल्या. हळूहळू या व्यवसायातील काही साधारण गोष्टी, आजार, व्यवस्थापन याची माहिती मिळवली. अनेक महिने शेळीपालकांच्या भेटी, त्यांचे प्राणी, फार्म यांची माहिती घेऊन भास्कर जाधव यांचा शेळीपालन व्यवसाय सुरू झाला.
सुरुवातीला आपल्याच भागातील गावरान २० शेळ्या आणि बोकडांपासून घराजवळ पडवीत त्यांचे शेळीपालन सुरु झाले. नातेवाईक, मित्र मंडळी आणि घरचे लोक तुला वेड लागलंय का ? तू हे काय करतोय ? हे आपले काम नाही. एखादी दुसरी नोकरी कर असे सांगून हिणवत होते. भास्कर जाधव यांचा दिनक्रम सकाळी 8 ते 10 शेळ्या चारायला जाणे. पुन्हा 11 ते 5 शाळेत, तिकडून आले की पुन्हा 7 वाजेपर्यंत शेळ्या चारायला जाणे. शेळ्या, शाळा, पुन्हा शेळ्या असा ठरलेला होता. अनुभव नसल्याने अनेक अडचणी येत असल्या तरी आता माघार नाही हे निश्चित झाले होते. बऱ्याच अडीअडचणींना सामना करून भास्कर जाधव यांनी आपल्या व्यवसायातील पहिल्या तीन वर्षांचा खडतर टप्पा पार केला. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. मात्र एवढे वर्ष जाऊनही शाळेचा पगार काही सुरू झाला नाही. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शेळी पालकांच्या भेटीगाठी आणि येणाऱ्या समस्यांवर चर्चा ते करत होते. शेळीपालन करता करता आपल्या तालुक्यातील अनेक छोटे मोठे शेळीपालकांच्या भेटीगाठी पण सुरूच होत्या. शेळीपालकांना येणाऱ्या अडीअडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी एकत्र येऊन काही करता येईल का यासाठीही त्यांचे प्रयत्न होते. दत्तात्रय कुंदे, पशुधन विकास अधिकारी प्रदीप कागणे यांच्याशी नियमित संवाद होता. दरम्यान भास्कर जाधव यांनी गावरान शेळ्यामध्ये सुधारणा करून राजस्थानी सिरोही सोजत, अजमेरी यासारख्या उच्च ब्रीडची जोपासना करायला सुरुवात केली. शेळी पालकांच्या मागणीनुसार राजस्थान, पंजाबला जाऊन तेथील शेळ्या बोकडांची आयात करून ते आपल्या शेळीपालकांना पुरवल्या. उच्च प्रजातीच्या शेळ्यांचे महत्त्व पटवून देण्याचे कामही केले. पंजाबच्या पंजाब बीटल जातीच्या मोठ्या प्रमाणात दूध आणि मांस उत्पादन देणाऱ्या शेळ्यांची खरेदी जोपासना केली. आपल्या बीटल जातीच्या बोकडाद्वारे तालुक्यात चांगली वाढ करून दाखवली. नोकरीला पाच वर्ष होऊनही पगार मात्र सुरु झालाच नाही.
एके दिवशी पशुधन विकास अधिकारी प्रदीप कागणे यांनी भास्कर जाधव, दत्तात्रय कुंदे यांना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक शेळीपालन करणारी कंपनीची स्थापना करावी असे सुचवले. भास्कर जाधव यांनी एक चांगली संधी दोन्ही हातांनी स्वीकारली. दत्तात्रय कुंदे, खाडे साहेब, गुणाजी डगळे, रोशन दातीर, चांगदेव गतीर, राजू गुळवे, समाधान कालेकर, रोहिदास गोवर्धने, लक्ष्मी गतीर, वैशाली कळसे, प्रवीण शिंदे, तानाजी किर्वे, अशोक भांगरे यांच्यासह इगतपुरी हिल्स हेल्दी गोट फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड स्थापन केली. या कंपनीच्या छताखाली 500 पेक्षा जास्त शेळीपालकांना आणून इगतपुरी तालुक्याचा शेळी पालनातील पुढील प्रवास सुरू केला. भास्कर जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या कंपनीच्या माध्यमातून सर्व शेळी पालकांच्या अडीअडचणी, समस्या सोडविण्याचे मोफत कार्य करत आहेत. कंपनीच्या माध्यमातून भविष्यात उत्तम प्रजातीच्या शेळ्यांची जोपासना, वाढ करून त्यातून पुढे मांस, दूध उत्पादन, चारा, खाद्य, गांडूळखत निर्मिती, शेळीचे मूत्रसंकलन, लेंडीखत पावडर, ईदचे बोकड जोपासना याप्रकारे उद्दीष्ट आहेत. यासाठी सर्वजण इगतपूरी तालुक्यात अविरत कार्य करत आहेत. बिनपगारी शिक्षक असूनही भास्कर जाधव तालुक्यासह अन्यत्र विविध प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून शेळी पालक बांधवांना मोफत मार्गदर्शनाचे कार्य करत आहे. कोणताही संकोच, कमीपणा, लाज न बाळगता शेळीपालन करत असलेल्या भास्कर जाधव म्हणतात की , आजच्या तरुण, युवा, बेरोजगार पिढीने घाबरून सैरभैर न होता गैरमार्गाला न जाता शेळी पालन करून आपली, आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी बसवावी.असा मोलाचा संदेश भास्कर जाधव यांनीआपल्या कार्यातून तरुणांना दिला आहे असे समजायला हरकत नाही. भास्कर नामदेव जाधव यांचा संपर्कासाठी क्रमांक 8669004649 आहे.

