
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध गावांतील शाळांना रोटरी क्लब हिलसिटी इगतपुरीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील नवनीत फाउंडेशन व अँटोस प्रयास फाउंडेशनतर्फे दर्जेदार एलईडी टीव्ही आणि इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे ई लर्निंग सॉफ्टवेअर देण्यात आले. ह्या शैक्षणिक साहित्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना सुलभपणाने फायदा होऊन शैक्षणिक प्रगती साधता येणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे साहित्य शाळांना वितरित करण्यात आले. मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव, म्हसुर्ली, कुर्णोली, कऱ्होळे, कोरपगाव, वाकी, कावनई, माणिकखांब, बिटूर्ली ह्या गावातील शाळांना रोटरी क्लब हिलसिटी इगतपुरीचे अध्यक्ष गोरख बोडके यांनी हे साहित्य मिळवून दिले. याबद्धल येथील शिक्षक आणि ग्रामस्थांनी गोरख बोडके, नवनीत फाउंडेशन, अँटोस प्रयास फाउंडेशनचे आभार मानले आहेत. येत्या काही दिवसात इगतपुरी तालुक्यातील अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार असल्याचे सांगण्यात आले.