
इगतपुरीनामा न्यूज – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय दप्तर मिळावे यासाठी रिलायन्स फाउंडेशनने पुढाकार घेऊन वचनपूर्ती केली आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना आज रिलायन्स फाउंडेशतर्फे दप्तराचे वाटप करण्यात आले. मोडाळेच्या लोकनियुक्त सरपंच शिल्पा आहेर यांच्या हस्ते ‘एक दप्तर मोलाचे’ अंतर्गत दप्तराचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तुपे, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी दप्तर, वह्या, पुस्तके, पेन आदी शालेय साहित्य वाटप करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन नेहमीच अग्रेसर असतो असे कौतुक सरपंच शिल्पा आहेर यांनी यावेळी केले. सामाजिक बांधिलकी जपत अतिदुर्गम भागातील गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन चांगली कामगिरी करीत असल्याचे मुख्याध्यापिका श्रीमती तुपे म्हणाल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तर मिळाल्याने सर्वांनी याप्रसंगी जल्लोष करून फाउंडेशनचे आभार मानले.