इगतपुरीनामा न्यूज – पाडळी देशमुख येथील गट नंबर ४२२ मधील काही क्षेत्र महामार्गासाठी संपादित आहे. या क्षेत्रातील बांधलेले व्यापारी गाळे पाडण्याचे आश्वासन महामार्ग प्रशासनाने दिले होते. त्यावर एक वर्षानंतरही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाडळी देशमुखचे धांडे कुटुंबिय १ मे महाराष्ट्र दिनी इगतपुरीच्या तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, महसूल विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, इगतपुरीचे तहसीलदार, पोलीस अधीक्षक आदींना याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे. सहकुटुंब आत्मदहनाला महामार्ग प्रशासन व संबंधित यंत्रणा जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेले क्षेत्र उताऱ्यावरून कमी झाले नसल्याचा फायदा घेत ४२२ हा गट बिनशेती करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी ह्या गटात व्यापारी गाळे बांधण्यात आले. या बिनशेती प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी एक वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल २०२२ ला पाडळी देशमुख येथील धांडे कुटुंब आमरण उपोषणाला बसले होते. त्यावेळी महामार्ग प्रशासनाचे अधिकारी रघुनाथ माने यांनी दखल घेऊन महिनाभरातच सदर बांधकाम पाडण्यात येईल असे लेखी आश्वासन इगतपुरीच्या तहसिलदारांसमोर दिले होते. मात्र त्यास एक वर्ष उलटूनही महामार्ग प्रशासनाने अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पाडळी देशमुख येथील योगीराज खंडू धांडे यांनी महाराष्ट्र दिनी इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर सहकुटुंब सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले आहे.