
इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत प्रकाशझोतात आलेल्या मोडाळे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदावर कचरू गोऱ्हे यांना बिनविरोध स्थान मिळाले आहे. त्याचप्रमाणे व्हॉइस चेअरमनपदी नंदू बोडके यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण १३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. सोसायट्यांची परिस्थिती नाजूक असल्याने बिनविरोध निवडणूक होण्यासाठी गोरख बोडके यांनी विशेष परिश्रम घेतले. बिनविरोध निवडीची बातमी समजताच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी मोडाळे गावात जल्लोष केला.
जननायक गोरख बोडके हे मोडाळे गावचे आधारस्तंभ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाने विविध क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. मोडाळे विविध कार्यकारी सोसायटीचे १३ संचालक बिनविरोध निवडून गोरख बोडके यांनी वर्चस्व निर्माण केले. त्यानुसार आज झालेल्या चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन निवडीकडे इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागले होते. कचरू गोऱ्हे यांचा चेअरमनपदासाठी अर्ज दाखल झाला. त्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके हे सूचक होते. व्हॉइस चेअरमन पदासाठी अनुमोदक म्हणून रतन मेदडे होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. गोरख बोडके यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन आगामी काळात भरघोस कामे करण्यासाठी सोबत असल्याचा शब्द दिला. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.