लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
मनात जिद्द व चिकाटी असेल अशक्यही शक्य होत असते. त्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सिद्ध केलंय नाशिकच्या सागर सुरेश मनोरे या विद्यार्थ्याने. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विभागामार्फत संवर्गातील दोनशे पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती आयोगातर्फे परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून नाशिक येथील सागर सुरेश मनोरे याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सागरचे बी आयटी पर्यंत शिक्षण झाले असून कोरोनाच्या काळातही मोठ्या मेहनतीने राज्यसेवेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. त्याचे यश प्रेरणादायी असल्याचे वडील सुरेश मनोरे यांनी सांगितले.
वडील सुरेश मनोरे यांनी घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून अतिशय चोख असे काम बजावले असून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. आता सध्या ते ठाणे येथे पोलीस निरीक्षक असून त्यांनी आपल्या मुलावर योग्य संस्कार केले आहे. सागरच्या यशात आई वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले. राज्यभरातून 597 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली असून सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.