इगतपुरीनामा न्यूज, दि. २
गोंदे दुमाला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर आमच्या सहकार विकास पॅनेलने मिळवलेला विजय हा आमच्या सर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. मतदारांच्या मनात असलेले आदराचे स्थान अबाधित असल्याची ही पोचपावती आहे. विविध भुलभुलैया दाखवून मतदारांवर निर्माण केलेला दबाव काम करू शकला नाही. सर्वच्या सर्व जागा आमच्या पारड्यात टाकणाऱ्या मतदारांचे मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील मोठी औद्योगिक वसाहत आणि प्रगतिशील शेतकऱ्यांची मोठी संख्या असणारे गोंदे दुमाला हे गाव आहे. ह्या गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक आज पार पडली. ह्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सरपंच गणपत जाधव, माजी चेअरमन विजय बळवंतराव नाठे, राजाराम बाबुराव धोंगडे, हरिश्चंद्र बाबुराव नाठे यांच्या नेतृत्वाखाली सहकार विकास पॅनलने लढत दिली. मतमोजणीमध्ये इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, विजय बळवंतराव नाठे, राजाराम बाबुराव धोंगडे, हरिश्चंद्र बाबुराव नाठे, शांताराम जाधव, भगवान नाठे, विजय कचरू नाठे, संजय नाठे, नामदेव नाठे, कृष्णा सोनवणे, गंगुबाई नाठे, चंद्रकला नाठे हे विजयी झाले. कुठल्याही प्रकारचा प्रचार न करता आणि मतदारांना आमिषे न दाखवता मी ह्या निवडणुकीला सामोरे गेलो. मतदारांनी माझ्यावरील विश्वास मतदानात दाखवून मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना विजयाचा आनंद दिला. सर्व मतदाराराजांचे मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव म्हणाले. इगतपुरी तालुक्यासह जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांनी पॅनलप्रमुख आणि नूतन संचालकांचे अभिनंदन केले आहे.