इगतपुरीनामा न्यूज – देशाच्या मोठे उद्योगपती असणाऱ्या अंबानी कुटुंबाच्या पाहुणचाराचा आनंद इगतपुरी तालुक्यातील दुर्गम मोडाळे येथील ५० विद्यार्थिनींनी लुटला. आज दुपार आणि रात्रीचे सुग्रास भोजन मुंबई येथील अंबानी यांच्या कार्यालयात देण्यात आले. निता अंबानी यांनी सर्व विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधून खेळीमेळीच्या वातावरणात मुलीच्या प्रगतीचा आढावा घेतला. मुंबई येथे सुरु असलेला मुंबई इंडियन्स विरुद्ध कलकत्ता दरम्यान क्रिकेट सामना मोडाळे गावातील ५० पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी अनुभवला. क्रिकेटचा आनंद द्विगुणित होऊन जीवाची मुंबई केल्याचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावर दिसून आला. रिलायन्स फाउंडेशनचे सहकार्य, रोटरी क्लबचे अध्यक्ष गोरख बोडके यांचा प्रयत्न आणि अंबानी परिवाराचे निमंत्रण स्वीकारून विद्यार्थिनींना ही सुवर्णसंधी लाभली होती. आज सकाळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, द लँड अंपायरचे संचालक श्री. वायकर यांनी मुलींना मुंबईच्या दिशेने रवाना करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला होता. ह्या उपक्रमाची चर्चा नाशिक जिल्हाभर पसरली होती. मोडाळे गावातील नागरिकांनी रिलायन्स फाऊंडेशन आणि गोरख बोडके यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला. क्रिकेट सामना पाहायला येण्या जाण्यासाठी मोफत बस, मोफत तिकीट, अंबानी कार्यालयात दोन्ही वेळचे सुग्रास भोजन, आकर्षक टी शर्ट आदी मोफत व्यवस्था फाउंडेशनतर्फे करण्यात आली होती. यापूर्वी मोडाळे गावाचा परिसर न सोडलेल्या ५० मुलींनी क्रिकेटचा आनंद, सुप्रसिद्ध क्रिकेटवीर, व्यापक असलेले विश्व, अब्जाधिश नीता अंबानी यांचे सानिध्य आणि मार्गदर्शन यांचा अतीव आनंद घेतला. रिलायन्स फाउंडेशन आणि गोरख बोडके यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू असे मुलींनी सांगितले.
स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps