झगमगाटी विकासापेक्षा समृद्ध विकासाची मूल्ये प्रत्येकांत रुजवा – सीईओ लीना बनसोड : मोडाळेकरांनी इगतपुरीची मान देशात उंचावली – आमदार हिरामण खोसकर
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
आपलं गाव डोळ्यासमोर ठेवून नुसता चकचकीत विकास न करता सर्वांगीण विकास साधून समृद्ध विकासाची नवी मूल्य विकसित करावीत. आपल्या गावाचे विविध विषयांतील गुणपत्रक वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. प्रशासन आपल्या पाठीशी असून विकासाच्या दिशेने गतीने धावायचे आहे असे प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. झगमगाट असणाऱ्या शाळा, अंगणवाड्या असतील आणि त्यामध्ये कुपोषण आणि शैक्षणिक दर्जा नसेल तर अजिबात उपयोग नाही. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाची कास धरावी असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचा वितरण समारंभ दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारप्राप्त मोडाळे ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन गौरव केला. पुरस्काराची रक्कम पंतप्रधानाच्या हस्ते डिजिटल स्वरूपात क्लिक करून पाठवण्यात आली. इगतपुरीवै आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आदींनी मोडाळे ग्रामपंचायतीला पुरस्काराचे वितरण केले. आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, अतिदुर्गम भागातील मोडाळे गावाने विकासाची साधलेली किमया वाखाणण्याजोगी आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेली उच्चतम कामगिरी पुरस्काराला पात्र ठरली. देशात इगतपुरीची शान वाढवणाऱ्या ह्या गावाचे मतदारसंघातर्फे अभिनंदन करतो असे ते शेवटी म्हणाले. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके म्हणाले की, माझ्या मोडाळे गावाच्या विकासाची दखल देशपातळीवर घेतली गेली. हे संपूर्ण यश माझ्या प्रत्येक गावकऱ्यांचे असून हा पुरस्कार गावाला समर्पित करतो.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, सरपंच मंगला बोंबले, उपसरपंच सिताबाई शेंडगे, ग्रामसेवक नानासाहेब खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य अंजना बोडके, संतोष बोडके, विठ्ठल जगताप, बीजलाबाई गोऱ्हे, आशा धात्रक, विमल शिंदे, ज्ञानेश्वर झोले, लंकाबाई ढोन्नर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी विस्ताराधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, उपअभियंता संजय पाटील, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, पशुविकास अधिकारी डॉ. प्रदीप कागणे, गट शिक्षणाधिकारी राजेश तायडे, ग्रामसेवक हनुमान दराडे, संभाजी मार्कंडे, तलाठी योगिता कोचुरे, पर्यवेक्षिका चित्रा कुलट, प्राथमिक शिक्षक आधार निकम, प्रकाश शेवाळे, अनिल बच्छाव, संतोष गणबोटे, अविनाश शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, ई. गव्हर्नरन्स आदी क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मोडाळे गाव गतिमान वेगाने विकास करणारे इगतपुरी तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. गावात सर्व प्रकारच्या मूलभूत सोई-सुविधा नागरिकांना पुरविण्यात येतात. त्यामुळे यापूर्वी देखील गावाला अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.