मार्गदर्शक : मधुकर घायदार
संपादक शिक्षक ध्येय, नाशिक
संपर्क : 9623237135
बहुतेक युवकांची उद्योग, व्यवसाय करण्याची इच्छा असते. अनेक युवक व्यवसाय सुरु करतात पण आपण यशस्वी होऊ याची त्यांना खात्री नसते. मात्र जे युवक योग्य व्यवसाय निवडतात, पूर्ण तयारी आणि अंगी कौशल्य प्राप्त करून व्यवसायास सुरुवात करतात ते नक्कीच यशस्वी होतात. व्यवसायाची निवड कशी करायची हाच एक मोठा प्रश्न अनेक युवकांसमोर आज आहे. मी कोणता व्यवसाय करू ? असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास नजर फिरवली तर जी गोष्ट आपणास दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते. पण एक व्यवसाय म्हणून आपण त्याकडे बघत नाही.
ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात. त्यांतील कोणताही व्यवसाय करण्यास तो तयार असतो. आपल्याकडे भरपूर पैसा असावा, मनात येईल त्या सर्व गोष्टी एका झटक्यात खरेदी करता याव्यात, आयुष्य चैनीचे असावे असे कोणाला वाटत नाही ? पण यासाठी आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी मात्र असायला हवी. उत्तम अर्थार्जन करून लवकरात लवकर आर्थिक स्थेर्य मिळविण्यासाठी योग्य व्यवसायाची निवड करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बेकरी शॉप हा व्यवसाय आज भारतात खूप मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बेकरी उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गरमागरम चहा सोबत ब्रेड, बटर, बिस्कीट आणि खारी असे बेकरीतून आणलेल्या खाद्यपदार्थांनी प्रत्येकाची सकाळ उजाडते.
विविध धान्याची पीठे भिजवून, मळून, आंबवून व भाजून त्यापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांना ‘बेकरी उत्पादने’ म्हणतात. यातील पाव हा महत्त्वपूर्ण आणि सर्वांना ज्ञात असलेला खाद्यपदार्थ आहे. बेकरी उत्पादनात पाव, बिस्कीटे, बनपाव, क्रीमरोल, केक, खारी, बटर, नानकटाई, डोनेट आदी विविध उत्पादनांचा समावेश होतो.
बेकरी उत्पादन करताना मुख्यत्वे गव्हाचे, मक्याचे पीठ, मैदा, अंडी, दुध, मीठ, लोणी, मार्गारीन, साखर, मलई, सोडा, बेकर यीस्ट, बेकिंग पावडर, वनस्पती तूप, मका, भुईमुग व खोबरे यांचे तेल आणि पाणी यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. बेकरी शॉप म्हणजेच बेकरीत तयार होणाऱ्या विविध उत्पादनांची फक्त विक्री करणे होय. युवकांनी यासाठी अंगी योग्य कौशल्य मात्र प्राप्त कारायला हवे. नाशिक येथील जिल्हा उद्योग केंद्र आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचे मार्फत बेकरी उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांना कर्ज पुरवठा करून उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन देखील याठिकाणी केले जाते.
युवकांनी बेकरी उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतल्यास त्यासाठी त्यास प्रचंड मेहनत, बाजारपेठेचे सर्वेक्षण, उत्पादनाचे ज्ञान व विक्री कौशल्य मिळविणे अत्यंत आवश्यक आहे.
भाडेतत्त्वावर दुकान घेऊन बेकरी व्यवसाय सुरु करण्यासाठी तीन ते पाच लाख भांडवलाची आवशकता असते. मात्र विक्री कौशल्य, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, व्यवसायाची आवड आदींच्या जोरावर या व्यवसायातून दरमहा वीस हजार ते एक लाख रुपये कमाई होऊ शकते. बेकरी उत्पादने विक्री या व्यवसायात सुमारे तीस ते पन्नास टक्के नफा दडलेला आहे.
श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी जरी बेकरी उद्योग सुरु झाले असले तरी गरिबांच्या पोटाची आग विझविण्यातही या उद्योगाचा मोठा हातभार आहे, हे वास्तव आहे.
युवकांनी ‘बेकरी शॉप’ या व्यवसायाचा विचार करायला हवा. मात्र यालाही गरज आहे काही अंगभूत कौशल्य आणि प्रामाणिक सेवा देण्याची. तर युवकांनो, बेकरी उत्पादने विक्री हे क्षेत्र तुमच्यासाठी आज एक उत्तम करिअर आहे.