महिलेवर अत्याचार करून झालेल्या निर्घृण खूनाच्या निषेधार्थ घोटी शहरात उत्स्फूर्त मोर्चा : नराधमांना फाशी देऊन भगिनीला न्याय देण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात महिलेवर झालेला अत्याचार व खूनाच्या घटनेच्या निषेधार्थ घोटी शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे पीडित महिलेला श्रद्धांजली वाहण्यात आली. घोटी शहरात उत्स्फूर्तपणे काढण्यात आलेल्या मोर्चात महिलांसह तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. संबंधित पीडित महिला अतिशय गरीब कुटुंबातील होती. तिच्या अखंड कुटुंबाचा उदरनिर्वाह तिच्यावर अवलंबून होता. अशा गरीब महिलेवर नराधमांनी अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारले. अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ह्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर भिती होती की दिवसाढवळ्या आमच्याच एका बहिणीवर अत्याचार होत असेल तर आम्ही सुरक्षित कशा असणार ? इगतपुरी तालुक्यात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाच्या उदघाटनासाठी येत आहेत. यावेळी त्यांनी सर्वप्रथम पीडित कुटुंबाची भेट घ्यावी, त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा इगतपुरी तालुक्यात त्यांना बंदी घालण्यात येईल असे आवाहन मोर्चात करण्यात आले. राज्य शासनाने पीडित कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देऊन लहान मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करावा. त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना भरीव मदत करण्यात यावी अशी विनंती याप्रसंगी सर्वांनी केली.

Similar Posts

error: Content is protected !!